गजानन उमाटे, नागपूर : सबका मकान सिसे का होता है… प्रत्येकाचं घर काचेचं असतं. आज तुमच्या हाती सत्ता आहे. त्यामुळे दगड तुमच्या हातात आहे. उद्या हा दगड दुसऱ्यांच्या हाती असू शकतो. भाजपने बदला घेण्यासाठी एवढ्या खालच्या पातळीवर घसरू नये, असा इशारा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. रायपूरमध्ये आजपासून काँग्रेसच्या महाअधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनाला जाण्यापूर्वी विजय वडेट्टीवार यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या नेत्यांबाबत, तसेच देशातील विरोधी पक्षांबाबत भाजपने अवलंबलेल्या धोरणावर त्यांनी सणकून टीका केली. महाराष्ट्र काँग्रेसमधील बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले वादावरही त्यांनी भाष्य केलं.
छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे आजपासून काँग्रेसच्या महाअधिवेशनाला सुरुवात होत आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात २०२४ च्या लोकसभा निवडणूकीची रणनिती ठरवली जाणार आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर देशात परिवर्तनाची लाट आहे. तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांचा पदग्रहण सोहळादेखील या अधिवेशनात पार पडणार आहे. आगामी काळात विविध राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणूकीबाबत चर्चादेखील या अधिवेशनात होणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
महाराष्ट्र काँग्रेसमधील दोन दिग्गज नेत्यांमधील वाट काही दिवसांपूर्वी चव्हाट्यावर आले होते. यावर विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, ‘ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमधला वाद संपल्यात जमा आहे. नेत्यांमधील मतभेदाचे विषय अधिवेशनात चर्चेला घेतले जात नाहीत. मात्र राज्यातले नेते हायकमांडला भेटू शकतात. सगळ्यांच्या भेटी-गाठी होतात, तशी या विषयावरही भेट होऊ शकते. ही भांडणं किरकोळ असतात…
कसबा आणि चिंचवड मतदार संघातील पोट निवडणुका महाविकास आघाडीसाठी सोप्या आहेत, आम्हाला सहज यश मिळेल, असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलंय. भाजपाच्या बदल्याच्या राजकारणाला आता लोक कंटाळले आहेत. बोलाचा भात आणि बोलाची कढी, असं हे सरकार असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.
भाजप बदला घेण्यासाठी कुठल्याही स्तरावर जातं. ही विकृत मानसिकता आहे. यातून भाजपने बाहेर पडावं, असा सल्ला वडेट्टीवार यांनी दिला आहे. ते म्हणाले, सबका घर सिसे का होता है… आज तुमच्या हाती सत्ता आहे. तुमच्याकडे दगड आहे. उद्या तो इतर कुणाच्या हाती असेल. भाजपने राजकारणात वैयक्तिक शत्रुत्व ओढू नये, असा इशारा त्यांनी दिलाय.