EXPLAINER : हिवाळी अधिवेशन २०२३ | सत्ताधाऱ्यांचा कस तर विरोधकांची कसोटी

| Updated on: Dec 07, 2023 | 12:20 AM

विरोधकांनीही राज्यातील नापिकी, कर्जमाफी, अवकाळी पाऊस, मराठा ओबीसी वाद, नाशिकचे ललित पाटील ड्रग्ज प्रकरण अशी विविध अस्त्रे आपल्या हाती ठेवली आहेत. या प्रश्नांना उत्तर देताना सरकारचा कस लागणार आहे.

EXPLAINER : हिवाळी अधिवेशन २०२३ | सत्ताधाऱ्यांचा कस तर विरोधकांची कसोटी
NAGPUR WINTER SESSION CM EKANTH SHINDE
Follow us on

नागपूर | 6 डिसेंबर 2023 : नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला ७ डिसेंबर (गुरुवार) पासून सुरवात होत आहे. सध्या तापमानाचा पारा खाली उतरला आहे. पण, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील आरोप प्रत्यारोपाच्या फैरी यामुळे नागपूरमधील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. गेल्या वेळी विरोधी पक्षनेते असलेले अजितदादा पवार हे आता सत्तेत सामील झाले आहेत. त्यामुळे सरकारची बाजू भक्कम झाल्याचे दिसत आहे. तरीही, विरोधी पक्षांच्या हाती अनेक मुद्दे आहेत. त्यामुळे या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांचा कस तर विरोधकांची कसोटी लागण्याची चिन्हे आहेत.

सत्ताधारी पक्षाने प्रथेप्रमाणे विरोधकांना चहापानाच्या कार्यक्रमाला आमंत्रित केले. तर, विरोधकांनीही नेहमीच्या प्रथेप्रमाणे त्यावर बहिष्कार घातला. आता सत्तेत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही काही काळ विरोधी पक्षनेते होते. त्यांनीही त्यांच्या कार्यकाळात त्या त्या वेळच्या सत्ताधारी पक्षाने आमंत्रित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. त्यामुळे विरोधकांनी असा बहिष्कार घालणे ही सुद्धा एक नवी प्रथा सुरु झाल्याचे दिसून येतेय.

हिवाळी अधिवेशनापुर्वी एक महत्वाची घटना घडली आहे ती म्हणजे तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेला विजय. सत्ताधारी भाजप, शिंदे गट आणि अजितदादा गट याचा विजयोत्सव साजरा करत आहेत. पण, विरोधकांनीही राज्यातील नापिकी, कर्जमाफी, अवकाळी पाऊस, मराठा ओबीसी वाद, नाशिकचे ललित पाटील ड्रग्ज प्रकरण अशी विविध अस्त्रे आपल्या हाती ठेवली आहेत. या प्रश्नांना उत्तर देताना सरकारचा कस लागणार आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत सरकावर जोरदार टीका केलीय. नागपूरकर डीसीएम हतबल झाले आहेत. आधी एकनाथ शिंदे यांना सांभाळण्याचे काम दिल्लीतून दिले. नंतर बारामतीकराना सांभाळण्याचे काम दिले. त्यामुळे ते हतबल झाले आहे. चोर चोर मिळून खाऊ अशी मंत्रीमंडळाची अवस्था आहे असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही सरकारवर टीका करताना शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम मिळालेली नाही. कापूस वाया जाण्याची शक्यता आहे. कांदा पिकाची अवस्था बिकट आहे. अशात शासन आपल्या दारी कार्यक्रम घेऊन सरकार नेमकं काय करत आहे?, असा सवाल केलंय.

विरोधकांच्या या आरोपांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाचा स्वभाव पाहता पुढच्या वेळेस सुपारी पान ठेवावं लागेल अशी खरमरीत टीका केलीय. त्यांच्या पत्रकार परिषदेत काही लोक झोपी गेले होते. तीन राज्यात जसे झोपले तसे पत्रकार परिषदेतही काही जण झोपी गेले होते. तशाच झोपेत हे पत्र लिहिलं आहे का? अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

राज्यातल्या काही भागात दुष्काळाचे सावट आहे. तर, काही भागात अवकाळी आणि गारपीटीने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालंय. नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याऐवजी सत्ताधारी निवडणुकांच्या प्रचारात गुंतले होते. पीक कर्जाच्या मुद्यावरून हिंगोलीतील शेतकऱ्यांनी त्यांचे अवयव विक्रीला काढले. यासारख्या घटनांचे मुद्दे विधिमंडळात विरोधक उपस्थित करणार आहेत.

कालावधी वाढवणार का?

हिवाळी अधिवेशन तीन आठवड्याचे घेण्यात यावे नागपूर करार आहे. मात्र, तीन आठवडे पूर्ण दिवस कामकाज न घेता सरकारने पहिल्या आठवड्याचे दोन आणि दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्याचे चार दिवस असे एकूण दहा दिवसांचा अधिवेशनाचा कार्यक्रम निश्चित केला आहे. १९ तारखेला कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यामुळे आणखी काही दिवस अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यात यावा अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. ही मागणी मान्य होणार का यावरही विरोधक लक्ष ठेवून असणार आहेत.

मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार का?

मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. मंत्री छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यात वाद निर्माण झाला आहे. बीडच्या घटनेचे पडसाद अधिवेशनात उमटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पूर्ण एक दिवस मराठा आरक्षणाच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. सरकार मराठा समाजाच्या पाठिशी असल्याचा ठराव मंजूर या अधिवेशनात केला जाईल. मात्र, भुजबळ यांच्यासह ओबीसी आमदार यांची यावेळी भूमिका काय असेल हे ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.