नागपूर : विधिमंडळाचे आजपासून (सोमवार 16 डिसेंबर) सुरु होणारे हिवाळी अधिवेशन (Nagpur Winter Session) शेतकरी, स्वातंत्र्यवीर सावरकर यासारख्या मुद्यांवरुन गाजण्याचे संकेत आहेत. भाजप आमदार आक्रमक पवित्रा घेत सभागृहात ‘मी सावरकर’चा नारा घुमवण्याची शक्यता आहे. पुढील सहा दिवस चालणाऱ्या अधिवेशनात ऐन थंडीत वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजपचे सर्व आमदार भगव्या रंगाच्या ‘मी सावरकर’ लिहिलेल्या टोप्या घालून विधानभवनात येण्याची शक्यता आहे. सावरकरांच्या मुद्द्यावर शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा भाजपचा डाव आहे. सावरकरांच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत भाजप सभागृहाचं कामकाज बंद पाडण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या नेतृत्वात काँग्रेस-राष्ट्रवादीसह महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर नागपुरात हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. महाविकास आघाडीचं सरकार स्थगिती सरकार आहे, शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी टीकेचे बाण डागले होते.
सत्तेसाठी किती लाचारी करायची हे शिवसेनेने ठरवावं, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी 25 हजार रुपयांच्या मदतीची मागणी केली होती. मंत्री नसलेल्या सरकारचा चहाच नको, असं म्हणत विरोधीपक्षाने सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला होता.
आम्ही वचन पाळणारे असून शेतकऱ्यांसाठी लवकरच चांगला निर्णय घेणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. सावरकरांबद्दल शिवसेनेला कायम आदरच राहील. जी भूमिका काल होती, तीच आज आणि उद्याही राहील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं होतं.
शिवसेनेची भूमिका तीच, सावरकरांच्या मताबद्दल तुम्ही काय केलं? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल
शपथविधीला 15 दिवसांपेक्षा जास्त काळ उलटूनही खातेवाटप न झाल्याच्या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अधिवेशनानंतर, डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात खातेवाटप जाहीर होण्याची चिन्हं आहेत.
आता, नागपुरातील हिवाळी अधिवेशनात (Nagpur Winter Session) काय होणार, कोणकोणते मुद्दे गाजणार, कसलेले विरोधीपक्ष नेते आणि नवखे मुख्यमंत्री यांच्यामध्ये कसा कलगीतुरा रंगणार, याकडे सर्वसामान्य जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे.