मलिक सत्ताधारी बाकावर बसले, भाजपला खटकले, सुषमा अंधारे यांनी डिवचले

| Updated on: Dec 07, 2023 | 11:36 PM

जामीन मिळाल्यानंतर नवाब मलिक पहिल्यांदाच अधिवेशनात हजर राहिले आणि ते सत्ताधारी म्हणजे अजित पवारांच्या बाकांवर जाऊन बसले. यावरून विरोधकांनी भाजपला घेरण्यास सुरुवात केली.

मलिक सत्ताधारी बाकावर बसले, भाजपला खटकले, सुषमा अंधारे यांनी डिवचले
DEVENDRA FADNAVIS, NAWAB MALIK AND AJIT PAWAR
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

नागपूर | 7 डिसेंबर 2023 : सकाळी ज्या नवाब मलिक यांच्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सवाल केले. त्याच मलिकांवरून संध्याकाळ होईपर्यंत महायुतीतच मतभेद झाल्याचे समोर आलेय. भाजपने मलिक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप केले. तेच मलिक सभागृहात सत्ताधारांच्या बाकावर बसले. यावरून भाजपच्या भूमिकेवर प्रश्न उभे राहिले. राजकीय वर्तुळाबरोबरच सोशल मीडियातून भाजपच्या भूमिकेवर टीका सुरू झाली. अखेरीस फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून नवाब मलिकांच्या सत्ता सहभागावर आक्षेप घेतला. मलिकांबाबत मात्र आरोप सिद्ध होईपर्यंत मलिक सत्तेत नको. कारण सत्तेऐवजी देश महत्वाचा असल्याची भूमिका फडणवीस यांनी घेतली आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ज्या मलिकांवर भाजपनं देशद्रोहाचे आरोप केले होते. तेच आता तुमच्यासोबत सत्तेत कसे? असा थेट सवाल केला. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार जाहीर वक्तव्य केलेलं आहे. एका देशद्रोहाच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकत नाही. उघड, उघड, दाऊद इब्राहिमसोबत व्यवहार झाले. त्याविषयी सरकारची भूमिका काय आहे? हे आम्हाला माहिती पाहिजे असे दानवे म्हणाले.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या या सवालावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिसवाल केला. देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर ते जेलमध्येमध्ये असताना तुम्ही त्यांना मंत्री पदावरून का काढलं नाही? याचं उत्तर आधी द्या नंतर आम्हाला सवाल विचारा असे ते म्हणाले. पण, याआधी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना ‘हे सरकार त्याच्या पाठीशी उभं राहत असेल तर हे दाऊद समर्पित सरकार आहे असच आम्हाला म्हणावं लागेल. दाऊद शरण सरकार आहे असंच आम्हाला म्हणावं लागेल असा आरोप केला होता. बॉम्बस्फोटाच्या आरोपीकडनं जमीन खरेदी करणं आणि दाऊदच्या माणसाकडनं जमीन खरेदी करणं. अध्यक्ष महोदय याचं तर समर्थन कसं केलं जाऊ शकतं? असा सवालही फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते असताना केला होता.

सभागृहात उत्तर देताना फडणवीस यांनी ज्यांच्या नेत्यांनी ही भूमिका घेतली की प्रत्यक्ष व्यक्ती जेलमध्ये असताना देखील आम्ही मंत्री पदावरून काढणार नाही. ते आता इथे भूमिका मांडताय असा टोला लगावला. आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलो नाही. मी आणि मुख्यमंत्री एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलो आहोत. आमच्या बाजूला अजितदादा मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यांच्या बाजूला भुजबळ साहेब बसले आहेत. त्यामुळे आमची काळजी करू नका असे प्रत्युत्तरही त्यांनी दानवे यांना दिले.

मात्र त्याच देवेंद्र फडणवीस यांनी संध्याकाळी अजितदादा यांना पत्र लिहिलं. यात ते म्हणतात, प्रति अजितदादा पवार नवाब मलिकांबद्दल आमची वैयक्तिक शत्रूता किंवा आकस अजिबात नाही. हे मी प्रारंभी स्पष्ट करतो. परंतु, ज्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप झाले ते पाहता त्यांना महायुतीत घेणं योग्य ठरणार नाही. सत्ता येते आणि जाते पण देश महत्वाचा आहे. आरोप सिद्ध न झाल्यास त्यांचा आपण जरूर स्वागत करावं. पण, आरोप असताना त्यांना सत्तेत सहभागी करणं योग्य होणार नाही. हे आमचं स्पष्ट मत आहे. मलिकांवरच्या आरोपानंतरही त्यांना मंत्रीपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण भावनांची नोंद घ्याल अशी आशा फडणवीसांनी व्यक्त केलीय.

फडणवीस यांच्या याच भूमिकेवरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यान डिवचलं. महाविकास आघाडीनं राजीनामा घेतलेले संजय राठोड तुमच्या सरकारमध्ये मंत्री कसे? असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी केलाय. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. बोले तैसा अजिबात न चाले. त्यासी बघून सरडेही लाजले अशी टीकाही अंधारे यांनी केलीय.

अजितदादा यांनी अनिल देशमुख सुद्धा सत्तेत येणार होते. पण, त्यांच्यावर भाजपनं आरोप केल्यामुळे भाजपनं नकार दिल्याचा दावा केला. परंतु, भाजपनं केवळ नवाब मलिक किंवा अनिल देशमुख यांच्यावर आरोप केलेले नाहीत. खुद्द अजित पवारांवर सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप भाजपनंच केलाय. याशिवाय छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, यामिनी जाधव, नारायण राणे, विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते, यशवंत जाधव, भावना गवळी, आनंदराव अडसूळ, संजय राठोड, राहुल कणाल, पार्थ पवार अशा असंख्य लोकांवर भाजपने आरोप केलेत आणि हे सर्वच आता महायुतीतील घातक पक्षात आहेत. त्यामुळेच भाजपच्या भूमिकेवर सोशल माध्यमावर टीका होऊ लागलीय.