नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 तर पंचायत समितीच्या 31 जागांसाठी उद्या मंगळवारी 5 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडून तयारी पूर्ण झाली आहे. पोटनिवडणुकीसाठी 6 लाख 16 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 1115 मतदान केंद्रांवर मतदानाची सोय करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या 16 जागांसाठी 79 उमेदवार रिंगणात आहेत. पंचायत समित्यांच्या 31 जागांसाठी 125 उमेदवार रिंगणात आहेत. या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उद्या सकाळी 7: 30 ते 5:30 पर्यंत मतदान पार पाडणार आहे, यासाठी निवडणूक कर्मचारी मतदान साहित्य मतदान केंद्राकडे घेऊन जात आहेत.
नागपुरात भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष पाहायला मिळतोय. काँग्रेसच्या प्रचारात मंत्री सुनील केदार मैदानात उतरले आहेत. तर दुसरीकडे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे बाजू सांभाळताना दिसत आहेत. महाविकास आघाडीचा कारभार तसेच स्थानिक मुद्द्यांवरुन भाजप काँग्रेसला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. निवडणूक येत्या 5 ऑक्टोबरला होणार असल्यामुळे सर्वच पक्षांनी प्रचाराला गती दिलीय.
या निवडणुकीत 2 लक्ष 96 हजार 721 स्त्री मतदार व 3 लक्ष 19 हजार 292 पुरुष मतदार असे एकूण 6 लक्ष 16 हजार 016 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूण 1115 मतदान केंद्रावर होणाऱ्या या मतदानात ग्रामीण भागात 863 व शहरालगतच्या 252 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. एकीकडे प्रशासन निवडणूक पार पाडण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. तर दुसरीकडे प्रत्येक राजकीय पक्ष आपल्याकडे मतदार कसा खेचला जाईल यासाठी जमेल तो प्रयत्न करताना दिसत आहेत.
असे असले तरी या निवडणुकीत कोणाची सरशी होणार आणि कोणाला अपयशाला समोरे जावे लागणार हे येत्या 5 ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष मदतान झाल्यानंतरच समजेल. सध्या तरी प्रचाराला रंग चढलाय हे मात्र नक्की.
नागपूर जिल्ह्यात कुठल्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये पोटनिवडणूक होणार?
नरखेड – सावरगाव, भिष्णूर
काटोल – येनवा, पारडसिंगा
सावनेर – वाकोडी, केळवद
पारशिवनी – करंभाड
रामटेक – बोथिया
मौदा – अरोली
कामठी – गुमथळा, वडोदा
नागपूर – गोधनी रेल्वे
हिंगणा – निलडोह,
डिगडोह – इसासनी
कुही – राजोला
नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 आणि पंचायत समितीच्या 31 जागांवर शिवसेना पोटनिवडणूक लढवणार आहे. जिल्हा परिषदेच्या 12 सर्कलमध्ये शिवसेनेनं उमेदवार उभे केले आहेत. आघाडी करण्याबाबतच्या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर न दिल्यामुळे दोन महिन्यांपूर्वीच शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला होता. तर काँग्रेस-
राष्ट्रवादीने एकत्र लढण्याची घोषणा स्थानिक पातळीवर केली आहे. त्यामुळे शिवसेना, भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी तिरंगी लढत नागपुरात पाहायला मिळेल.
ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर ही निवडणूक होत आहे, त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेत प्रतिष्ठा वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला चांगलाच कस लागणार आहे. डिसेंबर 2019 च्या निवडणुकीत इतर मागासवर्गीयांसाठी राखीव जागांवरुन निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या 16 आणि पंचायत समित्यांच्या 31 सदस्यांचं सदस्यत्व निवडणूक आयोगाने रद्द केलं होतं. ओबीसी आरक्षण संपुष्टात आल्याने आता खुल्या प्रवर्गातून निवडून येण्यासाठी ओबीसी उमेदवारांना चांगलाच कस लागणार आहे.
संबंधित बातम्या
नागपुरात सभांचा धडाका, ग्रामीण भागातही रंग चढला, ZP, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला