नागपूर : नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना धक्का बसला आहे. नितीन गडकरींचं मूळ गाव असलेल्या धापेवाडा आणि बावनकुळेंचं मूळ गाव कोराडीमध्ये भाजपला पराभवाला (Nagpur ZP Election Result) सामोरं जावं लागलं.
धापेवाड्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार महेंद्र डोंगरे विजयी झाले आहेत. तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी जिल्हा परिषद सर्कलमध्ये काँग्रेसचे उमेदवार नाना कंभाले विजयी झाले आहेत. बावनकुळेंना तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेल्या मतदारांनी भाजपला मतदान केलं.
फडणवीस सरकारमध्ये ऊर्जा विभागाचं कॅबिनेट मंत्रिपद सांभाळणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आलं होतं. यामुळे बावनकुळे यांचा तेली समाज चांगलाच नाराज होता. या नाराजीचा प्रत्यय जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालातून येत आहे.
नागपूरमधील 58 गटांच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीचा कल काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूने झुकताना दिसत आहे. नागपूर हिंगणातून माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते रमेश बंग यांचे पुत्र दिनेश बंग विजयी झाले.
ZP results Live : जिल्हा परिषद निकाल लाईव्ह
येनवामधून शेकापचे समीर उमप, तर आरोली-कोदामेडीमधून काँग्रेसचे योगेश देशमुख विजयी झाले आहेत. या तिन्ही ठिकाणी भाजपला मोठा पराभव पत्करावा लागला.
नागपूरमध्ये (Nagpur ZP Election Result) 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 12 पैकी 11 जागा मिळाल्या होत्या, तर फक्त एक जागा काँग्रेसला मिळाली होती. मात्र 2019 मध्ये चित्र पालटलं. काँग्रेस-राष्ट्रवादीने मिळून पाच जागा मिळवल्या. त्यामुळे नागपूर जिल्हा परिषद जितकी भाजपला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी महत्त्वाची आहे, तेवढीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही ती जिंकायची आहे.
निवडणुकांमध्ये नागपूरमध्ये विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे नागपूरचा गड राखण्यासाठी भाजपला मोठी कसरत करावी लागली.
नागपूर जिल्हा परिषदेच्या 58 गटांसाठी 270 उमेदवार रिंगणात होते. तर 13 पंचायत समित्यांच्या 116 गणांसाठी मतदान झाले.
2012 मधील पक्षीय बलाबल – 58
भाजप – 21
काँग्रेस – 19
शिवसेना – 08
राष्ट्रवादी – 07
बसप – 03
Nagpur ZP Election Result