मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. देश 50 वर्षे मागे गेला आहे. केंद्र सरकारचे हे अपयश झाकण्यासाठीच भारतीय जनता पक्षाकडून धार्मिक मुद्दे पुढे करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहेत. भाजपाच्या या षडयंत्राला बळी न पडता भाजपा व मोदी सरकारचे (Modi Government) अपयश जनतेसमोर उघडे करा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केले आहे. मुंबईतील टिळक भवन येथे राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष व सेलचे अध्यक्ष यांची आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सेलचे प्रभारी व प्रदेश उपाध्यक्ष सुनिल देशमुख, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हांडोरे, बसवराज पाटील, आ. प्रणिती शिंदे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुआ, सोनल पटेल, संपतकुमार, सोशल मीडिया राज्य प्रमुख विशाल मुत्तेमवार आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्ष सर्वात जुना व अनुभवी पक्ष आहे. काँग्रेसला मानणाऱ्यांची संख्या राज्यात मोठी आहे. त्यांच्यापर्यंत पोहचण्याची गरज आहे. डिजीटल सदस्य नोंदणीच्या माध्यमातून घरा-घरात जाऊन लोकांना काँग्रेसशी जोडा. आतापर्यत झालेली सदस्य नोंदणी समाधानकारक असली तरी अजूनही काही भागात सदस्य नोंदणीवर भर देण्याची गरज आहे. ‘गाव तिथे काँग्रेस’ हा आपला संकल्प असून या सदस्य नोंदणीच्या माध्यमातून आपण प्रत्येक गावात जाऊ शकतो. प्रत्येक बुथवर किमान 25 सदस्यांची नोंदणी करा. आपले लक्ष्य 2024 च्या निवडणुका आहेत त्यासाठी पक्ष संघटन मजबूत करा, काँग्रेसचा पराभव कोणीही करु शकणार नाही.
भारत हा तरुणांचा देश आहे पण या तरुणांच्या हाताला रोजगार देण्यात मोदी सरकार अयपशी ठरले आहे. दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन हवेतच विरले. उलट खाजगीकरणामुळे देशातील 2 कोटींपेक्षा जास्त नोकऱ्या कमी झाल्या आणि आता तर देशातील 45 कोटी नोकरी इच्छुक तरुणांनी नोकरीची आशाच सोडून दिली आहे एवढे भीषण वास्तव आहे. महागाई, शेतकरी, कामगारांचे प्रश्नही आहेत, या सर्व प्रश्नांवर मोदी सरकारकडे उत्तर नाही म्हणूनच धार्मिक मुद्दे पुढे करून समाजात तेढ निर्माण करायचा प्रयत्न सुरु आहे मात्र भाजपाच्या या षडयंत्राला बळी पडू नका त्याला चोख उत्तर देत मोदी सरकारचे अपयश जनतेसमोर मांडा, असेही पटोले म्हणाले.