नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादेतील सभेतून मशिदींवरील भोंग्यांबाबत पुन्हा एकदा राज्य सरकारला अल्टिमेटम दिलाय. त्यानंतर राज्यातील राजकारणात मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहेत. महत्वाची बाब म्हणजे राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबादेत (Aurangabad) भांदवि कलम 153 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. त्याचबरोबर कल 116. 117 नुसारही गुन्हा नोंद करण्यात आलाय. राज्य सरकारकडून राज ठाकरे यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा सध्या मनसे नेत्यांमध्ये सुरु आहेत. अशावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. भाजप दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रा विरोधात षडयंत्र रचत असल्याचा आरोप पटोले यांनी केलाय. नियम मोडेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याचाच भाग म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलाचं पटोले यांनी म्हटलंय.
राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर काँग्रेसचे नाना पटोले यांनी राज ठाकरे आणि भाजपवर टीका केलीय. महाराष्ट्रात वातावरण गढूळ करण्याचा भाजपचा आणि केंद्र सरकारचा प्रयत्न सुरु आहे. महाराष्ट्राची बदनामी हा भाजपचा एकमेव उद्देश आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नवे उद्योग यायला तयार नाहीत. आहेत ते उद्योग सोडून चालले आहेत. त्यामुळे बेरोजगारी आणि तरुणांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झालाय, असंही पटोले यावेळी म्हणाले. तसंच महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य, प्रशासन त्यांची कारवाई करेल. कायदा कुणी हातात घेऊ नये यासाठी प्रशासनाला पूर्वतयारी करावी लागते आणि प्रशासन तशी खबरदारी घेतं, असंही पटोले म्हणाले.
राज ठाकरे यांची जी काही वक्तव्ये ऐकायला मिळतात, त्यावरुन हे कुणाच्या इशाऱ्यावर केलं जात आहे हे स्पष्ट होतं. त्यामुळे केंद्र सरकारचं अपयश लपवण्यासाठी भाजप दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून षडयंत्र रचत आहे. महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आहे त्याचं पालन होणं ही सरकारची जबाबदारी आहे. कायदेशीर कारवाई व्हायला हवी, अशी भूमिकाही पटोले यांनी जाहीर केली आहे. माननीय सुप्रीम कोर्टानं भोंग्यांबाबत जे काही निर्देश दिले आहेत त्या नियमानुसारच सर्व काही असायला हवं. कायद्याच्या पलिकडे जाऊन कुणी भूमिका घेत असेल तर त्याला मुभा देऊन चालणार नाही. राज ठाकरे हा विषय नाही. कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही. कायदा तोडेल त्याचावर कारवाई झाली पाहिजे. आम्ही आमच्या मंत्र्यांची बैठक घेतली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झालीय. राज्यात कायदा सुव्यवस्था राखली गेली पाहिजे, असंच आमचं मत असल्याचंही ते म्हणाले.
महाराष्ट्रात दंगे भडकवण्याचं काम होतं आहे. धार्मिक विवाद घडवून आणण्याचे काहींचे प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून दुसऱ्या राज्यातून तलवारी मागवण्यात आल्या होत्या. पण आमच्या पोलिसांनी हे षडयंत्र हाणून पाडल्याचा दावाही पटोले यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केलाय.