मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) काँग्रेसला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची अवस्था अत्यंत दयनीय बनली. गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्येही काँग्रेस भाजपचा विजयाचा वारू रोखू शकली नाही. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं काँग्रेसला ‘झाडू’न बाजूला केलं. या पार्श्वभूमीवर रविवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली. येत्या काळात काँग्रेस देशपातळीवर चिंतन शिबिर घेणार असल्याचंही कळतंय. इतकंच नाही तर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आता सक्रिय व्हावे असा सूरही या बैठकीत उमटला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोठा दावा केलाय. 2024 ला मुख्यमंत्री हा काँग्रेसचाच असेल असा दावा पटोले यांनी केलाय.
‘2024 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच सर्वाधिक जागा मिळवील. पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल’, असा मोठा दावा पटोले यांनी केलाय. पटोले यांच्या या दाव्यानं राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीत काय प्रतिक्रिया उमटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण, यापूर्वीही पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचा दावा करत ‘एकला चलो रे’चा नारा दिला होता. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून तिखट प्रतिक्रियाही उमटल्या होत्या.
२०२४च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच सर्वाधिक जागा मिळवील. पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल.
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 14, 2022
पटोले यांनी दहा दिवसांपूर्वी लातूरमध्ये भाजपमुक्तीचा लातूर पॅटर्न राज्यभरात राबवण्याचं आवाहन काँग्रेस कार्यकर्त्यांना केलं होतं. भारतीय जनता पक्षाने सत्तेत येताना दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. सत्तेत आल्यापासून भाजपाने संविधान संपवण्याचे काम सुरु केले आहे. तर महाराष्ट्राला बदनाम करण्याचे पापही केले जात आहे. महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान केला जात आहे. भाजपाला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली असून आज लातूरमधून भाजपमुक्तीची सुरुवात झाली असून आता हे वातावरण मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवा. मराठवाड्यात काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळाले पाहिजे यासाठी जोमाने काम करा, असं आवाहन त्यांनी केलं होतं.
काँग्रेस पक्षाला राज्यनिहाय रणनिती आखावी लागेली. कुठे एकट्याने तर कुठे स्थानिक पक्षांसोबत आघाडी करावी लागेल, असं मत राहुल गांधी यांनी या बैठकीत व्यक्त केलं. तर प्रियंका गांधी म्हणाल्या की, निवडणुकीचा निकाल आपल्या बाजूने असणार नाही हे माहिती होतं. पण मेहनत केली आणि लढाई लढलो.
इतर बातम्या :