मुंबई : महाविकास आघाडीच्या नेते आणि मंत्र्यांवर, त्यांच्याशी संबंधित लोकांवर अंमलबजावणी संचलनालय (Enforcement Directorate) आणि आयकर खात्याच्या (Income Tax Department) धाडी सुरु आहे. या धाडीवरुन महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने नवनवे आरोप करत आहेत. अशावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपला खोचक सवाल केलाय. किरीट सोमय्या दररोज आरोप करून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण खराब करण्याचे काम करत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्यावरही सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते, आता ते भाजपात गेले तर मग ते पवित्र झाले का ? असा सवाल पटोले यांनी केलाय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे पाटणकर यांच्यावरील ईडीच्या कारवाईनंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, किरीट सोमय्या यांनी नारायण राणे व कृपाशंकर सिंह यांच्यावरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या आरोपाचे पुढे काय झाले? ज्यांच्यावर आरोप केले जातात ते भाजपात गेले की पवित्र होतात का? असा प्रश्न विचारत मुख्यमंत्र्यांच्या राजीनामाची मागणी पटोले यांनी धुडकावून लावली. किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत केलेल्या आरोपातील किती आरोप सिद्ध झाले. आरोप करणे व लोकांची बदनामी करणे हा किरीट सोमय्याचा धंदा आहे, अशी टीकाही त्यांनी केलीय.
मोदी सरकार में ED मतलब Extortion Department. pic.twitter.com/anRs3esueV
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 23, 2022
देशात महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ, शेतकरी, कामगार यांचे महत्वाचे प्रश्न आहेत, या महत्वाच्या मुद्द्यावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाकडून असे बेछूट आरोप करण्यात येत आहेत. भाजपचा हा आरोप-आरोपांचा खेळ लोकांच्या लक्षात आला आहे. दररोज महाविकास आघाडींच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून महाराष्ट्र भ्रष्टाचारी राज्य असल्याचे प्रतिमा करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे परंतु जनता भाजपाचा हा खेळ ओळखून आहे, अशी टीकाही पटोले यांनी भाजपवर केलीय.
इतर बातम्या :