मुंबईः नाशिक (Nashik) पदवीधर मतदार संघ निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही येथील नाट्यमय घडामोडी थांबायचं नाव घेत नाहीयेत. काँग्रेस पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. ती जिंकूनदेखील आणली. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) समर्थित उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला. मात्र अजित पवार यांच्या एका वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये येत्या काळात खडाजंगी होण्याची चिन्ह आहेत. काँग्रेसच्या घरात काय चाललंय, याची कल्पना नसताना अजित पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानं अशी वक्तव्य करणं योग्य नाही, अशी खंत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलून दाखवली. टीव्ही 9 वरील कार्यक्रमात मुलाखत देताना नाना पटोले यांनी ही नाराजी व्यक्त केली.
नाशिक पदवीधर मतदार संघात काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांनी एबी फॉर्म दिला होता. मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. तर त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. तांबे पिता-पुत्रांच्या या निर्णयावरून काँग्रेस नेत्यांनी तीव्र नाराजी दर्शवली. तांबे पिता-पुत्रांवर काँग्रेस पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली.
त्यानंतर महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. सत्यजित तांबे भाजपात जातील किंवा भाजपा त्यांना पाठिंबा देईल, अशी शक्यता होती. मात्र असं काहीही घडलं नाही. सत्यजित तांबे विजयी झाले, मात्र काँग्रेसकडून आमदारकी मिळाली असती तर जास्त आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया सत्यजित तांबे यांनी दिली.
नाशिक पदवीधर मतदार संघातून काँग्रेसने सत्यजित तांबे यांना तिकिट द्यायला हवं होतं. सत्यजित तांबेंना तिकिट द्या, हे सांगण्यासाठी शरद पवार यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनाही फोन केला होता. मात्र डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली आणि तिथंच गडबड झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.
सत्यजित तांबे यांची नाराजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर असल्याचं म्हटलं जातंय. त्यातच अजित पवार यांनी हे वक्तव्य केल्यानंतर नाना पटोले आक्रमक झाले आहेत. काँग्रेसच्या घरात काय चाललंय, याची अजित पवारांना कल्पना नाही. हे जाणून न घेताच अशा प्रकारची वक्तव्य करणं म्हणजे टीआरपी मिळवण्यासाठीच असावीत, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.
सत्यजित तांबे यांच्या वक्तव्यानंतर ते पुन्हा काँग्रेसकडे जातील, असं म्हटलं जातंय. मात्र या बाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.
नाना पटोले यांनी भाजपवर गंभीर आरोप केला. ते म्हणाले, ‘ भाजपने नाशिकमध्ये काँग्रेसच्या घरात आग लावल्याचा प्रकार केलाय. देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांच्या विजयाचा आनंद व्यक्त केला. दुसऱ्याच्या घरात आग लावल्यानंतरचा हा आनंद होता. असे किती घरं तुम्ही जाळणार आहात, असा सवाल त्यांनी केलाय.