मुंबई: राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची (mahavikas aghadi) अत्यंत महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीसाठी अपक्षांसह सर्व आमदारांना मुख्यमंत्री कार्यालयातून फोन गेले आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेते एच. के. पाटील हे संबोधित करणार आहेत. त्यामुळे बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या बैठकीपूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. आजच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना किमान समान कार्यक्रमाची अंमलबाजवणी करण्याची आठवण करून देऊ असं पटोले म्हणाले. तसेच अपक्ष आमदार नाराज असणं योग्यच आहे. आपल्या मतदारसंघातील कामाबाबत जर आमदार नाराज असतील तर त्यांचं चुकलं काय? असा सवाल पटोले यांनी केला आहे. बैठकी आधीच पटोले यांनी फटाके फोडल्याने या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
प्रत्येक छोट्या पक्षांशी संपर्क केला जात आहे. अपक्षांशी संपर्क केला जात आहे. त्यांना महाविकास आघाडीला मतदान करण्याची विनंती केली जात आहे. अपक्ष आमदार आणि छोटे पक्ष सुरुवातीपासूनच आमच्यासोबत आहेत. त्यामुळे कुणाला बोलायची गरज काय? एमआयएमही राष्ट्रवादीसोबत, समाजवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे ज्यांच्यासोबत जे पक्ष आहेत, त्यांच्यासोबत ते ते पक्ष चर्चा करतील, असं पटोले म्हणाले.
आघाडीत ज्या मोठ्या पक्षांसोबत अपक्ष आणि छोटे पक्ष आहेत. ते पक्ष आपल्या मित्र पक्ष आणि अपक्ष आमदारांशी बोलतील. समाजवादी पार्टी काँग्रेससोबत आहे. त्यामुळे त्यांना आम्ही आघाडीला मतदान करण्याची विनंती करणार आहोत. आमचे आमदार आमच्यासोबत आहेत. तेही आघाडीलाच मतदान करतील, असंही त्यांनी सांगितलं.
नाराज अपक्ष आमदारांची नाराजी दूर केली जाईल. मतदान ही संधी असते. या निमित्ताने अपक्ष आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील समस्या मांडता येतात. या आमदारांनी जनतेच्या हितासाठी काही गोष्टी मांडल्या, नाराजी व्यक्त केली तर त्यांचे काय चुकले? असा सवाल करतानाच आजच्या बैठकीत किमान समान कार्यक्रमाची मुख्यमंत्र्यांना आठवण करून देऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आमदारांना प्रशिक्षणाची गरज नाही. पण त्यांना मतदानाची थोडी माहिती द्यावी लागणार आहे. परवा मतदान आहे. आमदार दोन दिवस इथेच राहणार आहेत. त्यामुळे या आमदारांशी शिर्डीत नव संकल्प शिबीर झालं. त्यातील मुद्द्यांबाबत त्यांच्याशी चर्चा करणार आहे. लोहगड या माझ्या निवासस्थानी सर्व आमदारांना ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
शिवेसना आणि राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या उमदेवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. काँग्रेसच्या उमेदवारांची नावे कधी निश्चित होणार? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर विधान परिषदेचा उद्या निर्णय होईल, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.