नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्ध नागपुरात पाच लाखांच्या फरकाने निवडून येईल, अन्यथा राजकीय संन्यास घेईल, अशी घोषणा करणारे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी चांगलीच पलटी घेतली आहे. त्यामुळे नाना पटोलेंनी फक्त दिशाभूल करण्यासाठीच अशी वक्तव्य केली का असाही प्रश्न उपस्थित होतोय. विशेष म्हणजे नाना पटोलेंनी मंत्री गिरीश महाजन यांच्याशीही पैंज लावली आणि पराभव झाल्यास राजकीय संन्यास घेईल, असं सांगितलं होतं.
नागपुरात पटोलेंना त्यांच्या आव्हानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. पण त्यांनी यावर पत्रकारांनाच प्रतिप्रश्न केला. तुम्ही गडकरी आणि इतर नेत्यांचे एवढे जुमले ऐकता, मग माझ्या एका जुमल्यावर प्रश्न का विचारता, असं पटोले म्हणाले. त्यामुळे नाना पटोलेंचं आव्हान हे जुमला होतं हे त्यांनी स्वतःचं मान्य केलंय.
टीव्ही 9 मराठीवर बोलताना गिरीश महाजन आणि नाना पटोले आमनेसामने होते. यावेळी दोघांनी एकमेकांना आव्हान दिलं. गडकरींना यावेळी पाच लाख मतांनी हरवणार असं विश्वासाने पटोलेंनी सांगितलं. गिरीश महाजनांनी पटोलेंना आव्हान देत, गडकरींपेक्षा एक मतही जास्त घेऊन दाखवा, असं उत्तर दिलं. नाना पटोले निवडून आले तर मी निवृत्ती घेईन आणि निवडून न आल्यास त्यांनी निवृत्ती घ्यावी, असं आव्हान महाजनांनी दिलं. पटोलेंनीही हे आव्हान स्वीकारलं. विदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं खातं उघडणंही कठीण असल्याचं गिरीश महाजन म्हणाले.
नागपूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी बाजी मारली. काँग्रेसच्या नाना पटोले यांचा पराभव करत नितीन गडकरी यांनी विजयी झेंडा फडकवला. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या नागपुरात 2014 ला नितीन गडकरी यांनी विजय मिळवला आणि आता सलग दुसऱ्यांदा गडकरींनी नागपुरात विजयाची नोंद केली आहे.