मुंबई : मागच्या काही दिवसांपासून वंचित महाविकास आघाडीत (Vanchit Bahujan Aghadi) सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी वंचित बहुजन आघाडीसोबतच्या युतीबाबत महत्वपूर्ण विधान केलंय. या आघाडीसाठी तयार असल्याचं त्यांनी म्हटलंय.पण एक अटही त्यांनी ठेवली आहे. काँग्रेसचा विचार मान्य असेल. तो विचार ते जर मानत असतील तर आम्हाला कुणालाही सोबत घ्यायला काहीच अडचण नाही. त्यांना फक्त काँग्रेसी विचार मान्य असायला हवा, असं पटोले म्हणालेत.
काय असेल ते बसून चर्चा करु. आम्हाला कुठलीही अडचण नाही. आम्हाला सेक्युलर मतं एकत्र राहावीत आणि धर्माांध लोकांपासून देश वाचावा, असं वाटतं. देशाच्या विचारासाठी जे कोणी सेक्युलर विचार घेऊन सोबत येत असेल तर आमचा कुणालाही विरोध नाही. सामोरासमोर येऊन चर्चा केली आणि पावले टाकले तर योग्य राहील, असंही पटोलेंनी म्हटलंय.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे वंचित महाविकास आघाडीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा होत आहेत. यावर प्रकाश आंबेडकर यांनीही काही दिवसांआधी महत्वाचं विधान केलं. माझ्या पक्षाची जी राज्याची कमिटी आहे, तो जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं.
मागच्या काही दिवसातील घडामोडींमुळे वंचित महाविकास आघाडीत येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर आता नाना पटोलेंनीही भाष्य करत आपलं मत मांडलं आहे. धर्मनिरपेक्ष लोकांनी एकत्र यावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.