मुंबईः बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्या वादानंतर रवी राणा यांनी माफी मागितली तरी वस्तुस्थिती बदलणार नाही. हे सरकारच भ्रष्टाचारासाठी आलेलं आहे. या पक्षाचे आमदाराच म्हणतात, पैसे घेऊन गुवाहटीला (Guwahati) गेलो, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांना समर्थन देणाऱ्या आमदारांनी खोके अर्थात पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता. यावरून आमदार बच्चू कडू यांनी तीव्र भूमिका घेतली होती. फडणवीसांनी आम्हाला पैसे दिले असतील तर ते सिद्ध करावे अन्यथा रवी राणा यांनी माफी मागावी, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता.
अन्यथा १ नोव्हेंबर रोजी मोठा गौप्यस्फोट करणार, अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली होती. मात्र त्याआधीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मध्यस्थी केली. देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चेनंतर हा वाद आता निवळण्याची चिन्ह आहेत.
रवी राणा यांनी माफी मागितली. मात्र कार्यकर्त्यांची चर्चा केल्यानंतर उद्या दुपारी भूमिका स्पष्ट करू, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.
मात्र नाना पटोले यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली. शिंदे गटाच्या आमदारांनी खासदारांनी ५० खोके घेतलेत, हे त्यांचेच आमदार मान्य करतात. त्यामुळे खोके वाचवण्यासाठी त्यांना सुरक्षा दिली पाहिजे. विरोधकांचे रक्षण करायला जनता सक्षम आहे, आमच्याबरोबर जनता आहे. पण त्यांनी घेतलेले खोके वाचवायला त्यांना सुरक्षा व्यवस्था दिली जाते, असा आरोप नाना पटोले यांनी केलाय.
मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी कॅगमार्फत करण्यात येणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले, तुमच्या भ्रष्टाचाराची चौकशी कोण करणार? तुम्ही ज्या पद्धतीने लोकांना खाऊ देणार नाही, असे म्हणता, मात्र स्वतःच भ्रष्टाचार करतायत, त्याची चौकशी कोण करणार?
गुजरातमधील पूल दुर्घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना नाना पटोले म्हणाले, गुजरातमध्ये पूल पडला त्यात , ४०० लोकांचा मृत्यू झालाय, असा अंदाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगालमध्ये होते, तेथेही पूल पडला. हे अॅक्ट ऑफ गॉड नसून फ्रॉड आहे. तेच गुजरातमध्येही लागू होतं. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत याचे परिणाम दिसून येतील…