जळगाव : आगामी काळातील निवडणुका काँग्रेस स्वबळावर (Congress) लढणार, हा शब्द आम्ही दिला आहे, त्यात कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी आहेत, अशा परिस्थितीत पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गैर नाही, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा पुनरुच्चार केला आहे. (Nana Patole reiterated Congress will contest the upcoming elections on its own instead of Mahavikas aaghadi Shiv sena NCP in Maharashtra)
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे जळगाव दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी आज कृषी कायद्याविषयीच्या प्रतिचे दहन केले. यावेळी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी खान्देश प्रभारी आमदार प्रणिती शिंदे, अतुल लोंढे आ.शिरिष चौधरी माजी खासदार उल्हास पाटील आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
नाना पटोले हे प्रदेशाध्यक्षपदी रुजू झाल्यापासून स्वबळाचा नारा देत आहेत. त्यांनी यापूर्वीही अनेकदा काँग्रेस आगामी निवडणुका स्वबळावर लढेल अशी घोषणा केली होती. त्यावरुन महाविकास आघाडीत तणावाचं चित्र निर्माण झालं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पटोलेंच्या विधानांवरुन नाराजीही वर्तवल्याची माहिती आहे. मात्र आता नाना पटोले यांनी आपण शब्द मागे घेणार नसल्याचा निर्धार केला आहे.
आगामी काळातील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असा शब्द आम्ही दिला आहे, त्यात कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी आहेत, अशा परिस्थितीत पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गैर नाही. कार्यकर्त्यांना स्वबळाचे आदेश दिले आहेत, निवडणुकीला अजून तीन वर्ष आहेत. आम्ही बोललो आहे, शब्द दिलाय माघार घेणार नाही, असं नाना पटोले म्हणाले.
ओबीसी आरक्षण हटविण्याचे पाप हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे आहे. आता तेच जनतेची दिशाभूल करत आहेत, ओबीसी आरक्षण परत मिळवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही नाना पटोलेंनी दिली.
नाना पटोले हे विदर्भ दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी स्वबळाची घोषणा केली होती. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढेल, असा पुनरुच्चार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमरावतीत केला होता. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली. नाना पटोले मिशन विदर्भ अंतर्गत विदर्भातील जिल्ह्यांचा दौरा करत होते. त्यावेळी त्यांनी अकोला आणि अमरावतीमध्ये काँग्रेस स्वबळावरच लढणार असल्याचं पुन्हा एकदा म्हटलं होतं.
भाजप हा आमचा कायम विरोधी पक्ष आहे. शरद पवार भाजपविरोधात मोट बांधत असतील तर चांगली गोष्ट आहे. मात्र, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, असं पटोले यांनी पुन्हा एकदा जाहीर केलं होतं.
VIDEO : आम्ही स्वबळावरच लढणार : नाना पटोले
संबंधित बातम्या
महाविकास आघाडीतील आणखी एक पक्ष स्वबळावर मैदानात
‘स्वबळा’च्या निवडणुकीत जेव्हा काँग्रेसचे 28 मंत्री घरी गेले..!