रत्नागिरी – नाणार प्रकल्प (Nanar Refinery Project) झाला पाहिजे ही भाजपची (BJP) भूमिका आहे. त्यासाठी भाजप प्रयत्न करणार असल्याचं महत्त्वपूर्ण विधान भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केले आहे. तसेच नाणार येथे झालेल्या जमिन खरेदी, कुणी किती रूपयांना खरेदी केली, या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. आधी विरोध करायचा नंतर साटंलोटं करायचं ही शिवसेनेची भूमिका यापूर्वी देखील राहिल्याची टिका प्रसाद लाड यांनी केली आहे. तसेच यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गाचं देखील उदाहरण दिलं आहे. शरद पवारांची पंतप्रधानांची भेट घेतली त्याला गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. भाजप राष्ट्रवादीसोबत कदापी जाणार नाही. पवार ज्येष्ठ नेते आहेत, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी पवारांना भेटू शकतात. सध्या राज्यात होत असलेली कारवाई, संजय राऊत यांच्यावरील कारवाई किंवा राज्यातील इतर प्रश्नांवर ही भेट झालेली असू शकते अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिली.
राऊतांची मनोवृती बिघडली आहे. त्यांना गेट वेल सुन सांगावे लागेल. सोमय्यांनी राऊतांना काय ते उत्तर दिलं आहे. सोमय्यांना फसवण्याचं काम राऊत आणि गँग करत आहे. आम्ही त्याला भीक घालत नाही. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे , अशी टिका भाजप नेते प्रसाद लाड यांनी संजय राऊत यांच्यावरती केली.
केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई कधीही संपत नाही. त्यांची कारवाई 25 ते 30 वर्षे चालते. ती न्यायालयातून चालते. मुंबईच्या पोलिस आयुक्तांना कारवाईची एक लिस्ट दिली गेली आहे. आम्हाला डोळ्यात डोळे घालण्याचं आव्हान दिलं आहे. आम्ही त्याला घाबरत नाही. आरेला कारे करणारे आम्ही आहोत असं थेट आव्हान देखील प्रसाद लाड यांनी दिलं आहे.
कोकणातील पाच विभागातील शिवसेनेतील नाराज कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहेत. 2024 मध्ये भाजपचे 10 ते 11 आमदार निवडून येतील. तर 2 खासदार भाजपचे असतील. सेनेतील नाराजी, हिंदुत्वाचा मुद्दा सोडणे, कामं न होणं याबाबत शिवसेनेतील नेते नाराज आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील नेते देखील आमच्या संपर्कात असल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.