रत्नागिरी : गेल्या काही वर्षांपासून सर्वाधिक चर्चेत असलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पात (Nanar project) मोठं राजकीय ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत विरोधाची भूमिका घेतल्याने रिफायनरीचे समर्थन करणारे शिवसैनिक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे. (Nanar project Supporter Shivsainik join BJP)
रत्नागिरीतील रिफायनरीला विरोध करणाऱ्या शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसणार आहे. रिफायनरीला प्रकल्पाच्या बाबतीत विरोधाची भूमिका घेतल्याने समर्थन करणारे अनेक शिवसैनिक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. नाणार पंचक्रोशीतील तारळ, कुंभवडे, अणुसुरे आणि मिठगवाणेमधील 50 ते 70 कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
भाजपात कोण कोण प्रवेश करणार?
काही दिवसांपूर्वी नाणारचे विभागप्रमुख राजा काजवे यांनी रत्नागिरीतील नाणार रिफायनरीला समर्थन दिले होते. त्यानंतर त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर आता राजा काजवे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासोबतच नाणारचे उपविभाग प्रमुख सुहास कुवरे देखील भाजपचा झेंडा हाती धरणार आहेत. तर कोकण जनकल्याण प्रतिष्ठान अध्यक्ष पंढरी आंर्बेरकर हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
शिवसेनेला नाणार प्रकल्पाचा विरोध भोवणार
नाणार प्रकल्पाला समर्थन करणारे 50 ते 70 शिवसेनेचे कार्यकर्ते हे माजी खासदार निलेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेनेचे नाणार पंचक्रोशीतले सक्रीय कार्यकर्ते आणि सदस्यांचा यात समावेश असणार आहे. यामुळे रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाच्या विरोध शिवसेनेला भोवण्याची चिन्हे आहेत.
कोकणातील निसर्गसंपन्न अशा रत्नागिरी-सिंधुदुर्गाच्या सीमेवर नाणार तेलशुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्प प्रस्तावित होता. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील 14 गावं आणि सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील 2 गावांमध्ये प्रकल्पाचा विस्तार होणार होता. 13000 एकरावर हा प्रकल्प उभारला जाणार होता. नागरिकांचा विरोध असतानाही, या गावांमधील क्षेत्र 18 मे 2017 रोजी आद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं. हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या तीन सरकारी कंपन्या नाणार रिफायनरी प्रकल्प उभारत असून, त्यांची संयुक्तपणे रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल लिमिटेड म्हणजेच RRPCL कंपनी 22 सप्टेंबर 2017 रोजी स्थापन करण्यात आली.
काही महिन्यांपूर्वीच सौदी अरेबियाच्या अरामको कंपनीशी नाणार रिफायनरीबाबत करार झाला. नाणार रिफायनरीच्या उभारणीला तीन लाख कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. आशियातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प असल्याचे सांगण्यात येत असून, 2023 पर्यंत हा प्रकल्प कार्यन्वित करण्याचा सरकारचा विचार आहे. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पापासून अवघ्या 15-16 किलोमीटरच्या अंतरावर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे. (Nanar project Supporter Shivsainik join BJP)
LIC च्या या पॉलिसीत पैसे 233 रुपये गुंतवा, मॅच्युरिटीवेळी मिळवा 17 लाख रुपये https://t.co/dlQGJnfgJW #Investment #LIC
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 4, 2021
संबंधित बातम्या :
नाणारवरुन शिवसेनेतच जुंपली, स्थानिक आमदार-खासदारांच्या मतांनी सेनेच्या भूमिकेबाबत संभ्रम
Pravin Darekar | नाणारबद्दल मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा : प्रवीण दरेकर