मुंबई : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत (Nanded District Bank Election Result) 21 पैकी 17 जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीच्या समर्थ सहकार पॅनलचे सर्व नेते, कार्यकर्ते आणि उमेदवारांचे काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी अभिनंदन केले. निवडणुकीत सत्ताधारी भाजपला चारच जागांवर समाधान मानावं लागलं. (Nanded District Bank Election Result Congress Ashok Chavan reacts after Maha Vikas Aghadi victory)
“बॅंकेला गतवैभव प्राप्त होईल”
“समर्थ सहकार पॅनलला विजयी करणाऱ्या जिल्हा बॅंकेच्या सर्व सभासदांचेही मी आभार मानतो. जिल्हा बॅंकेच्या मतदारांनी महाविकास आघाडीवर मोठा विश्वास दाखवला आहे. त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवून शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्यांच्या या बॅंकेला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व संचालक प्रामाणिक प्रयत्न करतील, याची मला खात्री आहे” असं अशोक चव्हाण म्हणाले.
“एकाधिकारशाहीमुळे संस्थेची वाताहत”
“जिल्हा बॅंकेची परिस्थिती आज काय आहे, ते लपून राहिलेले नाही. मागील काही वर्षात एकाधिकारशाहीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या या संस्थेची वाताहत झाली आहे. ही बॅंक वाचवण्यासाठी मी राज्य सरकारच्या माध्यमातून 100 कोटी रुपयांचे अनुदानही मिळवून दिले. पण बॅंकेला चांगल्या परिस्थितीत आणण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज असून, महाविकास आघाडीच्या समर्थ सहकार पॅनलचे नवनिर्वाचित संचालक त्या दिशेने पराकाष्ठा करतील” असा विश्वास अशोक चव्हाणांनी व्यक्त केला.
कोरोनाची परिस्थिती आणि ज्येष्ठ नेते गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर कोणीही जल्लोष करुन नये, असे आवाहन चव्हाणांनी सर्व उमेदवार आणि विजयाच्या शिलेदारांना केले.
काय आहे निकाल?
नांदेड जिल्हा बँकेवर अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने झेंडा फडकवला. निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनेलला निर्विवाद बहुमत प्राप्त झालं. 21 पैकी 17 जागांवर यश मिळवत अशोक चव्हाणांनी परिवर्तन घडवले. तर सत्ताधारी भाजपला चारच जागांवर समाधान मानावं लागलं. भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा विजय झाला असला, तरी भाजपच्या पॅनेलचा धुव्वा उडाला.
महाविकास आघाडीतील काँग्रेस 12, शिवसेना 1, तर राष्ट्रवादी 4 जागांवर विजयी झाली. यापैकी काँग्रेसचे बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर तर भाजपचे भास्करराव पाटील खतगावकर हे आधीच बिनविरोध निवडून आले होते.
चिखलीकर जिंकले, पण पॅनल पराभूत
लोहा मतदारसंघातून भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर विजयी झाले, तर कंधार मतदारसंघातून त्यांचे पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर यांनीही बाजी मारली. अशोक चव्हाण आणि प्रतापराव चिखलीकर लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा आमनेसामने आल्याने दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र यावेळी चव्हाणांनी बाजी मारत लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढला. (Nanded District Bank Election Ashok Chavan)
दुसरीकडे, भाजप नेते बापूसाहेब गोरठेकर यांच्या उमरी मतदारसंघात भाजप उमेदवाराने अवघ्या तीन मतांनी निसटता विजय मिळवला. बिलोली मतदारसंघातून भाजपचे भास्करराव पाटील खतगावकर बिनविरोध विजयी झाले होते.
गोरठेकरांच्या मतदारसंघात निसटता विजय
भाजप नेते बापूसाहेब (श्रीनिवास) गोरठेकर (Bapusaheb Gorthekar) यांचे कट्टर समर्थक राहिलेल्या कवळे पितापुत्रांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कवळे गुरुजी या नावाने जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले मारोती कवळे यांचे पुत्र संदीप उमरी मतदारसंघातून नांदेड जिल्हा बँकेच्या रिंगणात उतरले होते.
भाजप नेते बापूसाहेब गोरठेकर यांची उमरी तालुक्यात मजबूत पकड आहे. परंतु मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या पाठिंब्यावर उमरीत भाजपचा धुव्वा उडवण्याचा निर्धार कवळेंनी व्यक्त केला होता. परंतु त्यांना विजय मिळवता आला नाही. याआधी विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांनी गोरठेकरांना पराभवाची धूळ चारली होती. मात्र गोरठेकर आपल्या उमेदवाराच्या माध्यमातून विधानसभेच्या पराभवाचा वचपा काढला.
संबंधित बातम्या :
नांदेड जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा, अशोक चव्हाणांनी परिवर्तन घडवले
सकाळी सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, दुपारी खासदार चिखलीकरांची नांदेड जिल्हा बँकेसाठी उमेदवारी
आधी अशोक चव्हाणांनी धूळ चारली, आता गोरठेकरांना कट्टर समर्थकांचं काँग्रेसमधून आव्हान
Nanded District Bank Election Result Congress Ashok Chavan reacts after Maha Vikas Aghadi victory