नांदेड : नांदेडमध्ये काँग्रेस आघाडीला मोठा झटका बसला आहे. नांदेडमध्ये अल्पसंख्याक समाजात लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या मकबूल सलिम यांनी बहुजन वंचित आघाडीत प्रवेश केला आहे. सलिम यांच्या वंचित आघाडीतील प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. नांदेड शहरात मुस्लिम समाजातील नामांकित व्यक्तिमत्व म्हणून मकबूल सलिम यांची ओळख आहे.
मतदानाची तारीख जस जशी जवळ येतेय तसा नांदेड मध्ये वंचित आघाडीचा जोर वाढताना दिसतोय. प्रकाश आंबडेकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या प्रभावाने अनेक जण वंचित आघाडीत प्रवेश करत आहेत. त्यातच आता माजी नगराध्यक्ष मकबूल सलिम यांची भर पडली आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा वजनदार चेहरा अशी मकबूल सलिम यांची ओळख आहे. सलिम यांनी आपण आंबडेकर यांच्या विचाराने प्रेरित होत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केल्याचे सांगितलं. आगामी काळात विधानसभेची निवडणूक लढवण्याचा आपला स्वार्थ नसल्याचे सलिम यांनी स्पष्ट केले. तसंच नांदेडमध्ये मुस्लिम नेतृत्व काँग्रेसने उभं राहू दिलं नाही, मुसलमानांचा केवळ मतपेटी भरण्यासाठी वापर केला अशी टीकाही सलिम यांनी केली.
वंचित आघाडीचा जोर कितपत
नांदेडमध्ये वंचित आघाडीकडे निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक अशा प्रचार यंत्रणेची कमतरता आहे. पैशानेही वंचित आघाडी कमजोर आहे, मात्र असं असतानाही वंचित आघाडी आता घराघरात पोहोचली आहे. काँग्रेसकडून त्यांच्या सभेत वारंवार वंचित आघाडीचा उल्लेख होतोय, त्यामुळे लोकही वंचित आघाडीच्या प्रभावात येत आहेत. मै भी चौकीदार प्रमाणे इथं प्रत्येक जण वंचित आघाडीचा प्रचारक बनला आहे. नांदेडच्या निवडणुकीच्या इतिहासात हा बदल पहिल्यांदाच घडतोय. हा बदल सातत्याने टिकून राहिला तर चमत्कार होईल अशी आशा राजकीय पंडित व्यक्त करत आहेत.