देवी-देवतांचा त्याग, तहसीलदारांकडे प्रतिमा सुपूर्द, नांदेडमध्ये शेकडोंचा ठिय्या, काय घडतंय?

| Updated on: Jan 05, 2023 | 4:00 PM

नांदेडमध्ये जात पडताळणी समितीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या ठिय्या आंदोलनामुळे मुख्य रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली.

देवी-देवतांचा त्याग, तहसीलदारांकडे प्रतिमा सुपूर्द, नांदेडमध्ये शेकडोंचा ठिय्या, काय घडतंय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

राजीव गिरी, नांदेडः हिंदू (Hindu) देवदेवतांची पूजा करता म्हणून जातीचे वैधता प्रमाणपत्र नाकारल्याचा नांदेडमध्ये (Nanded) आज महादेव कोळी समाजाच्या वतीने मोठा निषेध मोर्चा काढण्यात आला. प्रशासनासमोर आज महादेव कोळी (Mahadev Koli) समाजाने देव देवतांचा त्याग केला… शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार किरण अंबेकर यांनी आंदोलन स्थळी येत देवी देवतांच्या प्रतिमा स्वीकारल्या.

शेकडोंच्या संख्येने आलेल्या महादेव कोळी समाजाच्या नागरिकांनी देव देवतांच्या प्रतिमा तहसीलदाराकडे सुपूर्द केल्या.

काय आहे नेमकं प्रकरण?

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील खरटवाडी गावातील मयुरी पुंजरवाड या तरुणीने एमबीबीएसचं शिक्षण घेतलं आहे. मयुरी सध्या एमडीचं शिक्षण घेतेय.
मयुरीच्या वडिलांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे. मात्र मयुरीला महादेव कोळी जातीचे वैधता प्रमाणपत्र देण्यास समितीने नकार दिला आहे.

तुम्ही हिंदू देवी देवतांचे पूजन करता म्हणून महादेव कोळी नाहीत, असा अजब निष्कर्ष काढण्यात आला आहे.

असे असेल तर आम्ही देवांचा त्याग करतो, अशी भूमिका या समाजाने घेतली आहे. घरातल्या देवाच्या मूर्ती, प्रतिमा प्रशासनाच्या हवाली करणार असल्याचं या कुटुंबाने जाहीर केलं होतं. यापुढे आपण हिंदू धर्माच्या कोणत्याच चालीरीती पाळणार नसल्याचे मयुरीच्या वडिलांसह महादेव कोळी समाजाने जाहीर केलं..

त्यानुसार आज नांदेडमधील आयटीआय कॉर्नरवर महादेव कोळी समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर जमला. आंदोलकांनी आपल्याकडील देवी-देवतांच्या प्रतिमा प्रशासनाकडे सुपूर्द केल्या.

दरम्यान शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीची आचारसंहिता असल्याने मोर्चाला ऐनवेळी परवानगी नाकारली. त्यामुळे हा समाज संतप्त झाला. आंदोलकांनी तेथेच ठिय्या आंदोलन सुरू केले.