नांदेड | 05 ऑक्टोबर 2023, नजीर खान : अजित पवार हे भाजपसोबत गेले तेव्हापासूनच अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा होती. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील. पण सध्या शिंदेच मुख्यमंत्री आहेत, असं म्हटलं. याबाबत प्रश्न विचारला असता राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर भाष्य केलं. अजितदादा मुख्यमंत्री झाले तर पहिला हार मी घालेन, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्या आज नांदेडमध्ये आहेत. तिथे त्यांनी माध्यांमांशी संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.
अजितदादा मुख्यमंत्री झाले तर सर्वात आधी पहिला हार मी घालेन. पण सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता हाडाच्या भाजपच्या नेत्यांचे हाल होत आहेत. मात्र मला आनंद आहे की, सध्या युतीच्या पहिल्या पंक्तीत आमचेच सहकारी नेते बसलेले आहेत. नांदेडमध्ये एका दिवसात 24 रूग्णांचा मृत्यू झाला. यावरून सध्या संताप व्यक्त होत आहेत. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे आज नांदेडमध्ये आहेत. इथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नांदेडमधील घटनेसोबतच त्यांनी राजकीय मुद्द्यांवरही भाष्य केलं.
देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास नसेल. मात्र भाऊ म्हणून मला त्यांच्यावर विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस यांनी रोज शरद पवारांना नावं ठेवावीत. मात्र नांदेडमध्ये लोकांना योग्य उपचार द्यावा. नांदेडची घटना वेदना देणारी आहे. मृतांचा आकडा 24, 38 , 41 हे नंबर फार दुःखद आहेत. ट्रीपल इंजिन सरकार दिल्लीला जातं. यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जातात. मात्र नांदेडला येत नाहीत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. याचा मी निषेध करते, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मला इथं आता एक माता भेटली. तिचं बाळ दगावलं. ती फार दुःखात होती. नांदेड, छत्रपती संभाजीनगर, ठाण्यात अशाच घटना घडत आहेत. पालकमंत्री पदासाठी हे लोक दिल्लीपर्यंत जातात. मग इथे का येत नाहीत? सर्वसामान्य जनतेची हत्या या खोके सरकारने केली आहे. खोके सरकार घरं फोडण्यात मग्न आहे. मात्र लोकांच्या प्रश्नांकडे यांचं लक्ष नाही, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.