नांदेड | 30 ऑगस्ट 2023 : माजी मंत्री, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दोन महिने राजकीय जीवनातून ब्रेक घेतला होता. हे दोन महिने संपताच पंकजा मुंडे पुन्हा एकदा अॅक्टिव्ह मोडमध्ये आल्या आहेत. पंकजा मुंडे आता 10 पेक्षा अधित जिल्ह्यांच्या दौरा करणार आहेत. शिवशक्ती दर्शन हा 11 दिवसांचा दौरा पंकजा मुंडे करतील. आज नांदेडमधून त्यांनी या दौऱ्याची सुरुवात केली आहे. ठिकठिकाणी पंकजा मुंडे यांचं स्वागत केलं जातं.
पंकजा मुंडे या मागच्या काही दिवसांपासून भाजपमध्ये नाराज असल्याचं बोललं जात आहे. पंकजा मुंडे यांनीही ही नाराजी अनेकदा बोलून दाखवली. मात्र दोन महिन्यांआधी त्यांनी आपण राजकारणातून ब्रेक घेत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर पंकजा मुंडे या राजकारणात सक्रीय दिसल्या नाहीत. मात्र हा दोन महिन्यांचा काळ संपताच पंकजा मुंडे या पुन्हा अॅक्टिव्ह झाल्याचं दिसत आहे.
मागील दोन महिन्यांपासून सुट्टीवर असलेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आल्या आहेत. पंकजा मुंडे येत्या 11 दिवसांत राज्यातील 10 पेक्षा अधिक जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याला ‘शिवशक्ती दर्शन’ असं नाव देण्यात आलं आहे. हा दौरा राजकीय नसून केवळ देवदर्शनापुरता असणार आहे. या दौऱ्याची सुरुवात साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या माहूरच्या रेणुकामातेच्या दर्शनाने होणार आहे. माहूरची रेणुकामाता ही मुंडे परिवाराचं कुलदैवत आहे. त्यामुळे रेणुकामातेच्या दर्शनाने पंकजा मुंडे या दौऱ्याची सुरुवात करत आहेत.
पंकजा मुंडे या काही वेळा आधी नांदेडच्या विमानतळावर दाखल झाल्या. तेव्हा भाजप नेत्यांनी आणि पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी त्यांचं स्वागत केलं. पुष्पगुच्छ देत आणि हार घालत पंकजा मुंडे यांचं स्वागत करण्यात आलं. माहुरगडाकडे जाताना अर्धापूर, वारांगा फाटा आणि हातगावमध्ये मुंडे समर्थकांनी पंकजा यांचं स्वागत केलं. यावेळी त्यांना भव्य हार घालण्यात आला.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे यांनाही लोकांचं समर्थन मिळतं. पंकजा मुंडे एका मोठ्या ब्रेकनंतर अॅक्टिव्ह झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. पंकजा मुंडे यांचं ठिकठिकाणी स्वागत केलं जातंय. कोण आली रे कोण आली… महाराष्ट्राची वाघिण आली… अशा घोषणा पंकजा मुंडे यांच्या स्वागतावेळी देण्यात आल्या.