मुंबईः राज्यात दहीहंडीचा (Dahihandi) उत्सव दणक्यात साजरा झाल्यानंतर आता गणेशभक्तांना गणेशोत्सावाचे वेध लागलेत. कोरोना संकटामुळे दोन वर्षे सर्व उत्सव घरातच साजरे करावे लागले. त्यातच सुप्रीम कोर्टाच्या (Supreme court) आदेशानुसार, डॉल्बी डिजिटल साऊंडवर राज्य सरकारनेच बंदी घातली आहे. यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या असंख्य कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही बंदी हटवण्यात यावी अशी मागणी नांदेडचे शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर (Balaji Kalyankar) यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासंदर्भातील निवेदनही त्यांनी दिलंय. एकिकडे आमदारांनी ही मागणी केली आहे तर दुसरीकडे पोलिस प्रशासनही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सज्ज झालंय. नांदेडमध्ये पोलिसांनी शांतता समितीची बैठक घेऊन नागरिकांना ध्वनीसंबंधी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहेत.
आमदार बालाजी कल्याणकर यांनी 25 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी त्यांनी डॉल्बी संदर्भातील निवेदन दिलं. त्यात ते म्हणातात, ‘ नांदेड जिल्ब्यात जिल्हाधिकाऱ्यांनी गणपती उत्सवात डॉल्बी डीजेवर बंदी घातलेली आहे. त्या अनुशंगाने आदेशही काढले आहेत. जिल्ह्यातील 300 ते 400 व्यावसायिक या व्यवसायावर आपल्या कुटुंबियांचे पालन पोषण करीतल आहेत. कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्ष लॉकडाऊनमध्ये गेले. त्यामुळे या व्यावसायिकांवर कुऱ्हाड कोसळली होती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली होती. आता कुठे निर्बंध उठले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून डीजे वरील बंदीला स्थगिती द्यावी, अशी विनंती कल्याणकर यांनी केली आहे.
दरम्यान, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नांदेड पोलीसांतर्फे शांतता समितीची बैठक घेण्यात आली. नागरिकांनी गणपतीच्या उत्सावात कोर्टाने जी आवाजाची मर्यादा घालून दिली आहे, तिचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. त्यामुळे डॉल्बी डिजिटल साउंड सिस्टीममुळे वाद होण्याची चिन्हे आहेत.
काही दिवसांपूर्वी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनीदेखील डॉल्बी डिजिटलवरील बंदी हटवण्याची मागणी केली होती. या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्यावर अन्याय का करताय? एवढ्या आवाजाने काही फरक पडत नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. कोरोना संकटामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा सगळेच उत्सव धडाक्यात साजरे केले जात आहेत. त्यामुळे डॉल्बीवरील बंदी उठवण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय..