सोलापूर : जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी पक्षप्रमुखांना राजीनाम्याचा इशारा देत करमाळ्याची जागा प्रतिष्ठेची करून माझी उमेदवारी कापली, असा आरोप शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील (Narayan Patil vs Rashmi Bagal) यांनी केला. शिवसेनेने नारायण पाटील (Narayan Patil vs Rashmi Bagal) यांच्याऐवजी राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अनेक शिवसैनिक नाराज आहेत.
उमेदवारी न मिळाल्याने शिवसेना आमदार नारायण पाटील यांनी आमदारकीचा आणि पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष अर्ज भरला आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले नारायण पाटील यांची करमाळा विधानसभा मतदारसंघातून पक्की असलेली उमेदवारी ऐनवेळी कापण्यात आली. विद्यमान आमदाराऐवजी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीमधून आयात केलेल्या रश्मी बागल यांच्या गळ्यात शिवसेनेच्या उमेदवारीची माळ टाकली असा आरोप नारायण पाटील यांचा आहे.
“विद्यमान शिवसेना आमदाराला डावल्यामुळे करमाळ्यातील शिवसेनेचे पदाधिकारी नाराज आहेत. जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी पक्षप्रमुखांना राजीनामा देऊ अशी धमकी दिली आणि करमाळ्याची जागा प्रतिष्ठेची केली. मला एबी फॉर्म मिळत असतानाही सावंतांच्या खेळीमुळे माझी उमेदवारी कापली गेली” असा आरोप शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नारायण पाटील यांनी केला आहे. यामुळे शिवसेनेत निष्ठावंतांवर झालेल्या अन्यायाला तोंड फुटलं आहे.
पदाधिकारी नाराज?
शिवसेनेकडून राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल यांना तिकीट दिल्यामुळे करमाळ्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. आमदार नारायण पाटील यांनी शिवसेनेच्या चिन्हावर करमाळा पंचायत समिती आणि करमाळा तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आणली आहे. यामुळे करमाळ्यात शिवसेनेची ताकद वाढली असतानाही, नारायण पाटील यांना डावलल्यामुळे करमाळ्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आता रश्मी बागल यांचे काम न करण्याचा इशारा दिला आहे.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी सांगितले की, करमाळ्यातील निष्ठावंत आणि कट्टर शिवसैनिक आणि पदाधिकारी हे नारायण पाटील यांच्यासोबत असतील.