“नारायण राणेंना सूक्ष्म उद्योग खातं मिळालं, त्यामुळे त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं”

| Updated on: Aug 23, 2021 | 9:09 AM

शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे शिवसेनेत अस्वस्थ असून ते लवकरच भारतीय जनता पक्षात येतील असे मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले होते. त्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंवर हल्लाबोल केला.

नारायण राणेंना सूक्ष्म उद्योग खातं मिळालं, त्यामुळे त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं
Narayan Rane
Follow us on

जळगाव : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सूक्ष्म उद्योग खाते मिळाले आहे, त्यामुळे त्यांचे डोकेही सूक्ष्म झाले आहे. त्यामुळे ते एकनाथ शिंदे शिवसेनेवर नाराज असल्याचे म्हणत आहेत, अशी खरमरीत टीका शिवसेना नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे शिवसेनेत अस्वस्थ असून ते लवकरच भारतीय जनता पक्षात येतील असे मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले होते. त्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “नारायण राणे पहिले किती दिवस अस्वस्थ होते हे आपण पाहिले आहे, त्यामुळे त्यांचा अस्वस्थपणा निघाला आहे. पहिले ते शिवसेनेत अस्वस्थ होते, त्यानंतर ते काँग्रेसमध्ये अस्वस्थ झाले. आता भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना सूक्ष्म लघु उद्योग खाते मिळाले आहे. त्यामुळे त्यांचे डोकेही सूक्ष्म झाले आहे”

एकनाथ शिंदे हे शिवसेना नेते आनंद दिघे यांचे चेले आहेत. ठाणे येथे शिवसेनेचा झेंडा तेवत ठेवला त्यांचे शिंदे हे चेले आहेत. त्यामुळे नारायण राणे यांचे शिंदे यांच्याबाबत हवामान खात्याप्रमाणे अंदाज चुकीचे आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते? 

नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा काल वसईत पोहोचली होती. त्यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी, एकनाथ शिंदे मंत्री असले तरी सही पुरते आहेत. मातोश्रीशिवाय ते एकही सही करू शकत नाहीत. ते कंटाळले आहेत. आमच्याकडे आले तर घेऊ, असं सांगतानाच आम्ही मनात आणले तर लवकरच सरकारचे विसर्जन करू, असा दावाही नारायण राणे यांनी केला होता.

एकनाथ शिंदेंनी राणेंचा दावा फेटाळला

एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले आहेत. त्यांना आमच्यात घेऊ, असं विधान केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केलं होतं. राणेंच्या या वक्तव्याचा खुद्द नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी समाचार घेतला आहे. मला शिवसेनेत आणि मंत्री म्हणून संपूर्ण स्वातंत्र्य आहे. राणेंच्या विधानात काही तथ्य नाही. हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे

आशिष शेलारांची प्रतिक्रिया 

एकनाथ शिंदे शिवसेनेत नाराज असल्याचं सांगून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी धमाका उडवून दिला आहे. राणेंच्या या विधानावर चर्चा सुरू असतानाच भाजप नेते आशिष शेलार यांनीही मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे यांची घुसमट होत असेल आणि त्यांनी नारायण राणेंच्या कानात सांगितलं असेल तर त्यावर मी भाष्य का करावं, असं सूचक विधान आशिष शेलार यांनी केलं आहे. शेलार यांच्या या विधानावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.

VIDEO : नारायण राणे काय म्हणाले होते?

संबंधित बातम्या  

राणेंच्या ‘त्या’ विधानाचा एकनाथ शिंदेकडून समाचार; म्हणाले, त्यात तथ्य नाही, हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न

तर एकनाथ शिंदेंना आमच्यात घेऊ, ते शिवसेनेत कंटाळलेत, नारायण राणेंचा मोठा दावा