मुंबई: काल प्रभादेवीमध्ये शिंदे गट आणि शिवसेनेच्या (Shiv Sena) कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हे देखील दाखल झाले. गुन्हे दाखल होताच शिवसेना आक्रमक झाली. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. आज या सर्व पार्श्वभूमीवर भाजप (BJP) नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान राणेंनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेनेकडे तक्रार करण्यापलीकडे फार काही उरलं नाही. ‘मातोश्री’च्या दुकानामध्ये बसून तक्रारीचं मार्केटिंग सुरू असल्याची खोचक टीका नारायण राणे यांनी केली आहे.
पुढे बोलताना नारायण राणे यांनी म्हटलं आहे की, सदा सरवणकर हे आमचे मित्र आहेत. सध्या आमची युती आहे. मात्र युतीपेक्षाही ते आमचे मित्र आहेत, म्हणून त्यांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. असे हल्ले करू नका नाहीतर मुंबई आणि महाराष्ट्रात चालणं, बोलणं, फिरणं अवघ होईल त्यासाठी परवानगीची गरज लागेल, असा इशाराही नारायण राणे यांनी यावेळी शिवसेनेला दिला आहे.
दरम्यान शिवसेनेने साद सरवणकर यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. याबाबत नारायण राणे यांना विचारले असता, त्यांनी आरोप फेटाळून लावले. कमीत कमी बंदूकीच्या गोळीचा आवाज तरी आला असताना असं त्यांनी यावेळी म्हटलं.
शिंदे गटाबाबत बोलताना नारायण राणे यांनी म्हटलं आहे की, शिंदे गटाची मुंबईमध्ये ताकत किती आहे? याचा अंदाज तर शिवसेनेला आलाच आहे. एकाचवेळी 40 आमदार फुटतात आणि डोळ्या देखत सत्तेत देखील सहभागी होतात मात्र तरी देखील ते काहीच करू शकत नाहीत असं राणे यांनी म्हटलं आहे.