मुंबई : शिंदे सरकार सत्तेत येऊन तीन महिने होत आली आहेत, असे असतानाही ‘गद्दार’ या एका शब्दावरुन शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात मतभेद हे कायम आहेत. शिवाय दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे. आता (Narayan Rane) नारायण राणे यांनी अजबच दावा केला आहे. 2019 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र निवडणुक लढली असताना (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांनी (MVA) महाविकास आघाडीची स्थापना करुनच खरी गद्दारी केल्याचा थेट आरोप केला आहे. तर एकनाथ शिंदे हेच खरे शिवसैनिक आहेत. त्यांनी पडत्या काळात बाळासाहेब ठाकरे यांना साथ दिल्यानेच शिवसेना उभी राहिल्याचे नारायण राणे यांनी सांगितले आहे. शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात मतभेद असले तरी नारायण राणे हे पक्षप्रमुखांवर आणि आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
शिवसेना पक्ष हा बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व आणि त्यांना शिवसैनिकांची मिळालेली साथ यामुळे घडला आहे. काळाच्या ओघात याचा विसर अनेकजणांना पडला असला तरी प्रत्येक शिवसैनिकांना इतिहास हा माहिती आहे. शिवसैनिक हा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत उभा राहिल्यानेच ही संघटना वाढत गेली. आदित्य ठाकरे आता त्यावरील लोणी खाण्याचे काम करीत असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केलाय.
महाविकास आघाडीबरोबर जाऊनच उद्धव ठाकरे यांनीच गद्दारी केली. त्यावेळी त्यांनी सर्व शिवसैनिकांना विचारात घेऊन निर्णय घेतला नाहीतर स्वार्थासमोर त्यांना सर्वच बाबींचा विसर पडल्याचे राणे म्हणाले आहेत. त्यामुळे खरे गद्दार कोण हे आता जनतेचे समोर आल्याचेही राणे म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरे यांनी आता राजीनामा दिला तरी काय फरक पडणार आहे. एकतर सत्तेत असून काही फरक पडला नाही आता विरोधात असल्याने त्याने तर रस्त्यावर उतरणे गरजेचे असल्याचे मत राणे यांनी व्यक्त केले आहे. शिवाय त्यांच्या बद्दल अधिकचे बोलणार नाही, कारण हातून सत्ता गेल्यापासून ते सैरभैर झालेला आहे असेही ते म्हणाले.
शिवतीर्थावर शिंदे गट हाच दसरा मेळावा घेईल असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. आणि असे केली तरी कोणी काय मैदान उखडणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे हातून सर्वकाही गेले आहे. आता शांत बसण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसल्याचेही ते म्हणाले आहेत.