मुंबई : नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यापासून नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यातलं राजकीय प्रेम हे सबंध महाराष्ट्राने पाहिलं आहे. नारायण राणे हे शिवसेनेवर टीका करण्याची एक ही संधी सोडत नाहीत. मात्र आता एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या बंडाने हा संघर्ष पुन्हा ताजा केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडावरती उद्धव ठाकरे यांची संजय राऊतांनी घेतलेली एक मुलाखत आली. त्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक आरोप केले आहेत, तसेच शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. त्यावर शिंदे गटावर कडून पलटवार होत असतानाच आता नारायण राणे यांनी पुन्हा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सनसनाटी आरोप केले आहेत. तसेच संजय राऊत यांनी पवारांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून उतरवल्याचेही नारायण राणे म्हणाले आहेत.
याबाबत बोलताना राणे म्हणाले, उद्धव ठाकरे पक्षपात करायला लागले आणि त्यामुळे त्यांनी दुसरा गट तयार करून शिवसेनेच्याच नावावर ते बाहेर पडले आणि सरकारमध्ये गेले. स्वतःचे पद एकनाथ शिंदेंना मिळावं म्हणून पोटसूळ उठला, यातूनच ही मुलाखत संजय राऊत यांना घ्यायला लावली आणि संजय राऊत यांनी अजून एक काम हातात घेतलं आहे. राऊतांनी पहिलं काम केलं ते उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून खाली उतरवायचं आणि आता त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी ही मुलाखत आहे. मात्र संजय राऊत हे मनातून फत्ते झालो मी, विजय ठरलो मी, माझ्या गुरुंनी पवार साहेबांनी दिलेलं काम मी उत्तम रित्या केलं, याचं राऊतांना समाधान आहे, असा टोला राणे यांनी यावेळी लगावला आहे.
नारायण राणे एवढेच बोलून थांबले नाहीत तर आज वृत्तपत्रात मी वाचलं की एकनाथ शिंदेंना मारायला पण सुपारी दिली होती, मात्र आताचा हा पहिला प्रयोग नाही, त्या वेळेला एकेकाला कमी करण्याचं काम यांनीच केलं असाही आरोप राणे यांनी केला आहे. तर रमेश मोरे यांची हत्या कोणी केली? जयेंद्र जाधवांचा खून कोणी केला? तसेच मी 2005 ला शिवसेना सोडली तेव्हा किती कोणाला नाही सुपारी दिल्या, देशाबाहेरच्या गुंडांनाही मला मारण्यासाठी सुपारी दिल्या, असाही आरोप राणे यांनी केला आहे. या आरोपांनी पुन्हा राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.