कोकणात मुलांसाठी बापांच्या छातीचा कोट, राणे, तटकरे, कदमांचं राजकीय कसब पणाला!

| Updated on: Oct 12, 2019 | 2:53 PM

कोकणात तर तीन दिग्गज राजकीय नेत्यांनी आपल्या मुलासाठी छातीचा कोट करुन निवडणूक रिंगणात दंड थोपटले आहेत.

कोकणात मुलांसाठी बापांच्या छातीचा कोट, राणे, तटकरे, कदमांचं राजकीय कसब पणाला!
Follow us on

रत्नागिरी : प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या वडिलांचं स्थान खूपचं महत्वाचं असंत. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत आपल्या मुलामुळं वडिलांची प्रतिष्ठा पणाला लागलेली पाहायला मिळतेय. कोकणात तर तीन दिग्गज राजकीय नेत्यांनी आपल्या मुलासाठी छातीचा कोट करुन निवडणूक रिंगणात दंड थोपटले आहेत.

रायगडातून राष्ट्रवादीच्या उमेदवार आदिती तटकरेंच्या उमेदवारीने सुनील तटकरे, खेडमधून पर्यावर मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम तर सिंधुदुर्गातून नारायण राणे यांचं अस्तित्व नितेश राणेंच्या उमेदवारीमुळे पणाला लागलं आहे.

विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. प्रचाराचा धडाका सुरु आहेच. पण कोकणातली यावेळची वडिलांची लढाई विशेष लक्षवेधी ठरत आहे.

कोकणात मुलाच्या राजकीय अस्तित्वासाठी वडिलांना आपल्या सर्व राजकीय अस्तित्वाचा दाव पणाला लावावा लागला आहे. रत्नागिरी सिंधुदूर्ग आणि रायगड मधून तीन वडिलांची आपल्या मुलांसाठी प्रतिष्ठा पणाला लागलीय.

नारायण राणेंची लढाई

सर्वात मोठी लढाई सुरु आहे ती नारायण राणेंची. कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळालेले नितेश राणे निवडणूक रिंगणात आहेत. पण इथं नारायण राणेंच्या अस्तित्वाची लढाई सुरु झाली आहे. युती असूनही शिवसेनेने इथं राणेंविरोधात उमेदवार दिला आहे. त्यामुळे राणे या निवडणुकीत सर्व काही पणाला लावून नितेश राणेंचा विजय कसा होईल हे पाहात आहेत. आपल्या वडिलांची प्रतिष्ठा पणाला असल्यानं हा दबाव आहेच, पण राणेंविरोधात सर्व विरोधक एकवटले असल्यानं इथली लढत राणे कुटुंबासाठी प्रतिष्ठेची असणार आहे.

रामदास कदम

सिंधुदुर्गानंतर रत्नागिरीत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम रिंगणात आहेत. गेली चार वर्ष योगेश कदम दापोली खेड मतदारसंघातून आमदारकीसाठी मोर्चेबांधणी करत आहेत. शिवसेनेचे पाच टर्म आमदार राहिलेले सूर्यकांत दळवी यांना डावलून इथून योगेश कदम निवडणूक लढवत आहेत. नाराज दळवी आणि गेल्या निवडणुकीत इथून राष्ट्रवादीचे संजय कदम निवडणून आल्यानं संजय कदम असे दुहेरी आव्हान कदम कुटुंबासमोर आहे. त्यामुळेच योगेश कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून रामदास कदम हे दापोली खेड मतदारसंघात टळ ठोकून आहेत.

सुनील तटकरे

रायगड जिल्ह्यातील सर्वात रंगतदार सामना हा तटकरेंची कन्या आदिती विरुद्ध शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर यांच्यात आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून तब्बल 24 वर्षानंतर तटकरे आणि घोसाळकर यांच्यात ही लढत पाहायला मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीत श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून तटकरे यांना 38 हजारांचे लिड मिळाले होते. त्यामुळे मुलगी आदितीसाठी तटकरे यांनी सेफ मतदारसंघ शोधला आहे. पण सेनेने कुठल्याही परिस्थितीत राजकीय तडजोड न करणारा उमेदवार दिल्याने इथे काटे की टक्कर आहे. त्यामुळे सुनील तटकरेंना पुन्हा रायगडवर आपलं वर्चस्व मिळवण्यासाठी ही निवडणूक जिंकावीच लागणार आहे.

रायगडमधून सुनील तटकरे, रत्नागिरीतून पर्यावरण मंत्री रामदास कदम तर सिंधुदुर्गातून नारायण राणे आपल्या मुलांना इथं जिंकून आणण्यासाठी राजकारणातील सर्व राजकीय खेळ्या खेळतील. त्यामुळे या तीन ठिकाणच्या मतदारसंघातील लढती नक्कीच लक्षवेधी आहेत.