सिंधुदुर्ग : भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेवर पोहोचलेले नारायण राणे (Narayan Rane) यावेळी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं त्यांचे चिरंजीव आणि आमदार नितेश राणे यांनी स्पष्ट केलंय. 2014 च्या निवडणुकीत पराभव झालेल्या कुडाळ-मालवण मतदारसंघातूनच (Kudal Malvan Vidhansabha) नाराणय राणे पुन्हा निवडणूक लढतील, असंही नितेश राणे (MLA Nitesh Rane) म्हणाले.
2014 ला नारायण राणेंचा शिवसेनेच्या वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांनी पराभव केला होता. नारायण राणे पुन्हा राज्यात येणार का या चर्चेला आता पूर्ण विराम मिळालाय. कारण, ते निवडणूक लढणार असल्याचं स्वतः नितेश राणेंनीच स्पष्ट केलं.
काँग्रेससोबत फारकत घेतल्यानंतर नारायण राणे भाजपात जातील, अशी चर्चा होती. पण भाजपात न जाता राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आणि ते एनडीएचा घटकपक्ष झाले. भाजपने त्यांना राज्यसभेवरही पाठवलं. राज्यात राणेंना मंत्रिपद मिळेल, असं बोललं जात होतं. पण शिवसेनेच्या विरोधामुळे त्यांना दिल्लीच्या राजकारणात जावं लागलं. आता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी सुरु केली आहे.
2014 ला काय झालं होतं?
2014 ला कुडाळ-मालवण मतदारसंघातून शिवसेनेचे वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) नारायण राणेंचा पराभव करत 10,500 मतांनी विजयी झाले. या मतदारसंघात चौरंगी लढत झाली होती. शिवसेनेच्या वैभव नाईक यांना 71 हजार, काँग्रेसच्या नारायण राणे यांना 60,500, तर भाजपच्या बाब मोंडकर यांना 4500 आणि राष्ट्रवादीच्या पुष्पसेन सावंत यांना 2500 मते पडली होती. नारायण राणेंचा अनपेक्षित पराभव करून वैभव नाईक हे राज्यात जाएन्ट किलर म्हणून गणले जाऊ लागले.
नारायण राणे आता कोणतीही निवडणूक लढवतील की नाही याबाबत उलट सुलट चर्चा केल्या जात होत्या, तर वैभव नाईक यांच्या विरोधात स्वाभिमानकडून आगामी उमेदवार म्हणूनही अनेकांची नावे चर्चिली जात होती. मात्र नितेश राणे यांनी कुडाळमधील एका कार्यक्रमात राणे हेच आगामी उमेदवार असतील असं जाहीर करून तूर्तास तरी सर्व चर्चांना विराम दिला आहे.