मुंबई: शिवसेना-भाजप युतीने खवळलेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते खासदार नारायण राणे हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने नवी रणनीती आखणार आहेत. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीनं सहकार्य करावं अशी विनंती नारायण राणे शरद पवारांना करणार आहेत. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली.
लोकसभेला रायगडमध्ये राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांना नारायण राणे मदत करतील, त्याबदल्यात रत्नागिरीत राष्ट्रवादीनं मदत करावी, असा प्रस्ताव नारायण राणे हे शरद पवारांसमोर ठेवणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
आघाडीच्या जागावाटपात रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आल्यास निलेश राणे यांना पाठिंबा देण्याबाबतही हालचाली सुरु आहेत.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत काय झालं?
लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून निलेश राणे आणि शिवसेनेकडून विनायक राऊत यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी विनायक राऊत यांनी तत्कालिन खासदार निलेश राणे यांचा पराभव केला होता.
दुसरीकडे रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील तटकरे विरुद्ध सध्याचे केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गिते यांच्यात लढत होती. त्यावेळी सुनील तटकरे यांचा निसटता पराभव झाला होता.
विधानपरिषद निवडणुकीत राणेंची तटकरेंना मदत
दरम्यान, मे 2018 मध्ये विधानपरिषद निवडणूक झाली होती. या निवडणुकीतून सुनील तटकरे यांनी सुपुत्र अनिकेत तटकरे यांना सक्रीय राजकारणात उतरवलं. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांनी शिवसेनेच्या अॅड राजीव साबळे यांचा पराभव केला. या निवडणुकीत नारायण राणे यांनी सुनील तटकरेंना मदत केली होती.
कोकणात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने विधानपरिषदेसाठी उमेदवार उभा करावा, असा प्रस्ताव भाजपने दिला होता. मात्र, नारायण राणेंनी स्वत:च्या पक्षाचा उमेदवार उभा न करता, अनिकेत तटकरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता.
वाचा – रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा : निलेश राणे, विनायक राऊत, की सुरेश प्रभू?
संबंधित बातम्या
पुणे, रत्नागिरी, मुंबईत काँग्रेस आयात उमेदवार देणार?
रत्नागिरी : प्रमोद जठार आणि विनायक राऊतांच्या ‘गळाभेटी’मागील रहस्य काय?
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा : निलेश राणे, विनायक राऊत, की सुरेश प्रभू?