उस्मानाबाद : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापू लागलं आहे. अवघ्या काही दिवसांवर निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. प्रत्येक पक्षाकडून जोरदार प्रचार सुरु आहे. महाराष्ट्रातील एकीकडे राष्ट्रवादी-काँग्रेस तर दुसरीकडे भाजप-शिवसेना युतीमध्ये एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपकडून मोठ्या प्रमाणावर प्रचारसभा घेतल्या जात आहेत. तसेच आतापर्यंत पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात दोन सभा घेतल्या आहेत. 9 एप्रिलाही मोदींची महाराष्ट्रातील उस्मानाबाद येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत.
यापूर्वी मोदी-ठाकरे 10 एप्रिल 2017 ला दिल्लीत झालेल्या NDA च्या बैठकीवेळी एकत्र आले होते. तर दोन वर्षांनी उद्धव ठाकरे आणि नेरंद्र मोदी एकत्र दिसणार आहेत.
उस्मानाबाद येथे होणाऱ्या सभेत नेमकं उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. युती होण्याआधी शिवसेनेकडून अनेकदा मोदी आणि भाजपवर जोरदार टीका करण्यात आली होती. यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि मोदी एकाच व्यासपीठावर उपस्थित असणार आहेत. उस्मानबाद येथील मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील उस्मानाबाद जागेसाठी दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला मतदान होत आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी उस्मानाबादमध्ये एकूण 14 उमेदवरा लोकसभेच्या रिगंणात उतरले आहेत. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राणाजगजितसिंह पाटील यांना तिकीट दिलं आहे.
उस्मानाबादमधून शिवसेनेचे रविंद्र गायकवाड हे विद्यमान खासदार आहेत. रविंद्र गायकवाड यांनी 2014 ला राष्ट्रावादीच्या राणाजगजितसिंह पाटील यांचा पराभव केला होता. मात्र रविंद्र गायकवाड यांना तिकीट न देता ओमराजे निंबाळकर यांना तिकीट देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी 10 जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर मतदारसंघांचा समावेश आहे.