Cm Eknath Shinde Speech : ‘मोदी घुसके मारेगा हे माहित म्हणून…’, मुख्यमंत्री शिंदे यांचा हल्लाबोल, ठाकरे गटावर केली सडकून टीका

| Updated on: May 17, 2024 | 8:18 PM

बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार कुणी हिरावून घेतला होता. तर याच कॉंग्रेसने. हे विचार तुम्हाला चालणारे आहेत का? उबाठा आज कुणाचे जोडे घेऊन फिरत आहेत? उद्धव ठाकरे म्हणजे रंग बदलणारा सरडा आहे.

Cm Eknath Shinde Speech : मोदी घुसके मारेगा हे माहित म्हणून..., मुख्यमंत्री शिंदे यांचा हल्लाबोल, ठाकरे गटावर केली सडकून टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

मुंबई : बिघडलेल्या पोरांनो तुम्ही चुकीचा मार्ग धरला आणि म्हणता माझा बाप चोरला? बाळासाहेब ठाकरे यांची प्रॉपर्टी तुमची आहे. त्यांची संपत्ती ही सुद्धा तुमचीच आहे. आम्हाला ती प्रॉपर्टी नको, संपत्ती नको. आम्हाला काही नको. आम्हाला हवे आहेत ते केवळ बाळासाहेब ठाकरे यांचे विचार. त्यांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार कुणी हिरावून घेतला होता. तर याच कॉंग्रेसने. हे विचार तुम्हाला चालणारे आहेत का? उबाठा आज कुणाचे जोडे घेऊन फिरत आहेत? उद्धव ठाकरे म्हणजे रंग बदलणारा सरडा आहे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी 20 मे रोजी मतदान होत आहेत. मतदानासाठी प्रचारसभेचा अखेरच्या टप्प्यात महायुतीची जाहीर सभा शिवाजी पार्क मैदानात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या सभेला प्रमुख उपस्थिती होती. या सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

उबाठाची आताची थेरे पाहून बाळासाहेब यांचे काय होत असेल? असा जळजळीत सवाल करून ते पुढे म्हणाले. ज्या कॉंग्रेसला बाळासाहेब ठाकरे यांनी सतत विरोध केला त्याच कॉंग्रेसला सोबत घेऊन उबाठा मते मागत आहेत. बाळासाहेब यांचे नाव घेण्याचा यांनी अधिकार गमावला आहे. आम्ही नकली शिवसेना? बरोबर आहे. कारण आता तुमच्याकडे धनुष्यबाण नाही, बाळासाहेब यांचे विचार नाही, दररोज शिव्या देणे इतकेच तुम्हाला माहित आहे. तुमची सेना ही शिव्या सेना आहे. त्यांनी कुणालाही मत द्यावे. पण, बाळासाहेब यांची शिवसेना ही कॉंग्रेसला कधीही मत देणार नाही असे शिंदे म्हणाले.

उबाठाच्या प्रचारात बाळासाहेब यांचे फोटो आणि त्याखाली कॉंग्रेसचा पंजा आहे. कॉंग्रेसचा हात पाकिस्तान के साथ आहे आणि उबाठाचा हात कॉंग्रेस के साथ आहे. आतंकवादी इक्बाल मुसा तुमच्या रॅलीत फिरतोय. त्याचे कार्यकर्ते तुमच्यासोबत फिरताहेत. काय चालू आहे? मुंबईवरील हल्ला आठवा. मुंबईत शेकडो हजारो मुंबईकरांचे बळी गेले. रक्ताचे पाट वाहिले. त्यांच्यासोबत तुम्ही गेला. दहा वर्षात मोदी पंतप्रधान झाल्यानंतर एक तरी बॉम्बस्फोट झाला का? नाही झाला. होणारही नाही. मुंबईत काही झालं तरी मोदी घुस के मारेगा हे त्यांना माहीत आहे. पुलवामाचा बदला सर्जिकल स्ट्राईक करून घेतला. ज्यांनी मुंबई वाचविण्यासाठी रक्ताचे पाट वाहिले त्यांच्याविरोधात तुम्ही जात आहात अशी टीका त्यांनी केली.

मोदी यांनी पुलवामाचा बदला सर्जिकल स्ट्राईक करून घेतला. पाकिस्तानला माहित आहे. मोदी आहे तर काहीच करता येणार नाही. मोदी गया तो गुजरात गया असं बाळासाहेब म्हणाले होते. त्यामुळे मोदी पाहिजे. मोदी गया तो देश गया. देशातील 140 कोटी जनता काय म्हणते? माझं मत मोदींना. कारण त्यांनी देश सुरक्षित ठेवलं. कारण, त्यांनी गरीबांचं कल्याण केलं. त्यांनी भ्रष्टाचार रोखला. त्यांनी अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली. लाभार्थ्यांचे पैसे जनधन खात्यात जमा केले. त्यांनी 80 कोटी जनतेला मोफत रेशन दिले. पाच लाखांचा आरोग्य विमा दिला. बेरोजगारांना काम दिलं. देशाला आत्मनिर्भर केलं. मोदी देशाला महासत्तेकडे घेऊन जात आहे. देशाचा ऐतिहासिक वारसा जपत आहे. बाबासाहेबांचं संविधान जपण्याचं काम मोदींनी केलं. त्यामुळे देशाला कणखर देशभक्त प्रधानमंत्री पाहिजे. एकीकडे देशभक्ती आहे. दुसरीकडे देशद्रोही विचार करणारे आहेत. त्यामुळे मोदी पाहिजे की… फिर एक बार…मोदी सरकार. आपल्याकडे आहे, महाराष्ट्र का काम, मोदीजी का नाम, और अयोध्ये का राम असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.