नाशिक : दोन हजारची नोट बँकेत जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यावर विरोधी पक्षाकडून टीका केली जात आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. नोट बंदी हा नेहमीचा खेळ आहे. कर्नाटकात निकाल लागला त्यानंतर दोन हजार च्या नोटा बंद केल्या जात आहेत. 8 वर्ष झाले नोटबंदी करून किती काळा पैसा बाहेर आला? हे कळालं नाही, असं छगन भुजबळ म्हणालेत.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज ईडी चौकशी होतेय. त्यावरही भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाही मार्गाने निषेध केला जातोय. जयंत पाटील यांनी काही चुकीचे केले नाही त्यांच्यावर कारवाई होणार नाही. भाजपाकडे लॉन्ड्री आहे. त्यांच्याकडं जे येतात ते त्यांना स्वच्छ करतात, असं ते म्हणाले. जयंत पाटलांच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. आमचा यंत्रणावर दबाव टाकण्याचा हेतू नाही. आमच्या प्रांताध्यक्षांवर कारवाई होत असताना आम्ही गप्प बसयाचं का?, असा सवाल त्यांनी केलाय.
ईडी आणि भारत सरकारच्या पोलीस यंत्रणा कशाप्रकारे वापरल्या जात आहेत, सर्वांना माहित आहे. सर्वात आधी माझ्यावर प्रयोग झाले. त्यावेळी ईडी काय सर्वांना माहिती नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की भीती निर्माण करू नका, असं त्यांनी सांगितलं.
महाविकास आघाडीच्या जागावाटपाची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. त्यावर बोलताना, जागा वाटपावर कुठेही एकमत आणि चर्चा झाली नाही. नवनवीन आकडे समोर येतात आम्ही ते आम्ही इन्जॉय करतोय, असं भुजबळ म्हणालेत.
दुसरी-तिसरी आघाडी होणार की नाही माहिती नाही. पण भाजपच्या हुकूमशाही विरोधात सर्व पक्षांनी उभे राहीले पाहिजे , असं भुजबळांनी म्हटलंय.
ज्या अर्थी दंगलींना सुरवात झाली आहे. त्याअर्थी निवडणूक जवळ आली आहे. जिथे जिथे निवडणूक आली तिथे हिंदु मतांना आकर्षित करण्यासाठी अशा दंगली केल्या जात आहेत. कर्नाटकमध्ये हिजाब, बजरंगबली हे मुद्दे निवडणुकीत आणले गेले. शेवटी काय तर पराभव झाला. येवढा प्रचंड पराभव होईल अस वाटलं नव्हतं, असं भुजबळ म्हणालेत.