त्याच दिवशी प्रफुल्ल पटेल राजीनामा देणार होते, पण मी थांबवलं..; छगन भुजबळ यांची सनसनाटी पत्रकार परिषद

| Updated on: Jul 09, 2023 | 1:18 PM

Chhagan Bhujbal on Sharad Pawar : शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा नेमकं काय घडलं?; छगन भुजबळांनी घटनाक्रम सांगितला...

त्याच दिवशी प्रफुल्ल पटेल राजीनामा देणार होते, पण मी थांबवलं..; छगन भुजबळ यांची सनसनाटी पत्रकार परिषद
Follow us on

नाशिक : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाशिकच्या येवल्यामध्ये काल जाहीर सभा घेतली. त्यात त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेत छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या आरोपांना उत्तर दिलं. तसंच अनेक मोठे गौप्यस्फोटही केले. प्रफुल्ल पटेल राजीनामा देणार होते, पण त्यांना आपण रोखल्याचं भुजबळांनी सांगितलं आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा नेमक्या काय घडामोडी घडल्या. त्याबाबतही भुजबळांनी मोठे खुलासे केले आहेत.

शरद पवार यांनी राजीनामा दिला तेव्हा मला याबाबतची काहीही कल्पना नव्हती. तेव्हा त्यांना मी मनवलं. पण तेव्हा त्यांनी ऐकलं नाही. पण पुढे काहीच दिवसात त्यांनी राजीनामा मागे घेतला, असं भुजबळ म्हणाले.

सुप्रिया सुळे यांना कार्यध्यक्ष करण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला. तेव्हा आम्हा सगळ्या नेत्यांना तो निर्णय कळवण्यात आला. तेव्हा प्रफुल्ल पटेल नाराज झाले. ते म्हणाले मी राजीनामा देतो. दुसऱ्या क्रमांकांच्या पदावरून तिसऱ्या क्रमांकाचं पद मी घेणार नाही, असं म्हणाले. पण मी त्यांना समजावलं. तुम्ही आणि सुप्रिया दोघं कार्यध्यक्ष व्हा असं सुचवलं असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.

छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना काही प्रश्नही विचारले आहेत. सगळे लोक जर पवार साहेबांवर एवढं प्रेम करतात, तर मग नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार का पडतात?, असा सवाल भुजबळांनी केला आहे.

2019 मध्ये अजित पवार यांच्या समोर सगळं घडलं. पण शरद पवार यांनी घुमजाव केल्याने अजित पवार सकाळी शपथ घेतली. मीच त्यावेळी आमदारांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले होते, असा खुलासाही छगन भुजबळ यांनी केला आहे.

माझ्यावरच राग का?, असा प्रश्न भुजबळांनी शरद पवार यांना केला आहे. येवल्याचे लोक सांगतात की, तुम्ही माफी मागण्यासारखे काही केलेलं नाही, असं ते म्हणालेत.

भाजपने फुले-शाहू-आंबेडकर यांचा अपमान केला म्हणता. मग तुम्ही त्यांच्यासोबत का गेला? ज्यांनी अपमान केला, ते रिटायर झाले. शिंदे-फडणवीस यांना सांगितल्यानंतर एक महिन्याच्या आत महात्मा फुले यांच्या प्रतिमा उभ्या राहिल्या आहेत. देवेंद्र फडणवीस दिल्लीत तुषार मेहता यांना भेटले आणि आमचं ओबीसी आरक्षण आलं, असं विधानही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.