नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या नाशिक दौऱ्याचा आज तिसरा दिवस आहे. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे विविध लोकांच्या भेटी घेत आहेत. स्थानिक मनसेचे पदाधिकारी, शेतकरी हे राज ठाकरे यांच्या भेटीला येत आहेत. यात शेतकरी भेटी दरम्यानचा एक प्रसंग सध्या नाशकात चर्चेचा विषय बनला आहे.
राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शेतकरी आले होते. यावेळी या शेतकऱ्यांना राज ठाकरे यांनी प्रश्न विचारला. मनातील खंत बोलून दाखवली. तुम्ही मला मतदान करत नाही, मग माझ्याकडे का येता? ज्यांनी टोलमुक्त महाराष्ट्र करू, असं आश्वासन दिलं होतं, त्यांनाच तुम्ही मतदान केलं ना? जे तुमची पिळवणूक करता, त्यांनाच तुम्ही मतदान करता. याचं भान तुम्ही ठेवायला हवं, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांच्या या एका मागोमाग येणाऱ्या प्रश्नांना शेतकऱ्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं. शेतकरी सगळे आता तुमच्यामागे असल्याचं आश्वासन शेतकऱ्यांनी दिलं. त्यानंतर राज ठाकरे यांनीही आपला राग आवरता घेतला.
येत्या तीन चार दिवसांत शेतकरी प्रतिनिधी यांच्यासह मुख्यमंत्री यांच्याशी भेट घेणार असल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी आश्वासन दिलं.
सर्वसामान्य लोक राज ठाकरे यांचं भाषण ऐकायला गर्दी करतात. पण त्याचं रुपांतर मतांमध्ये होत नाही, हे निवडणुकांमध्ये वारंवार दिसतं. हीच खंत आज राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांसमोर बोलून दाखवली.
सुरत चेन्नई महामार्ग बाधित शेतकऱ्यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली. जमीन अधिग्रहित करताना विचारलं नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. मी ठाम पणे तुमच्या पाठीशी उभा, असा शब्द राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना यावेळी दिला.
नाशिक जिल्हा बँकेच्या सक्तीच्या वसुली विरोधात काही शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. कर्ज भरण्यासाठी बँकेकडून दिलासा मिळण्याची मागणी करणार आहेत. काही दिवसांपूर्वी देखील शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती.
मोठ्या थकबाकीदारांना जिल्हा बँक पाठीशी घालत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. बँकेचे कर्ज भरण्यासाठी शेतकरी तयार आहेत. मात्र वेळ देण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. एकीकडे अवकाळीमुळे शेतीचं नुकसान झालंय. तर दुसरीकडे बँकेची वसूली अशा दुहेरी संकटात शेतकरी सध्या सापडला आहे. यावर राज ठाकरे यांनी तोडगा काढवा, असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.