ताई 10-15 आमदार असतील, तर युती करायला आम्ही तयार; पंकजा मुंडे यांना पाठिंबा देण्यास ‘हा’ नेता पुढे

| Updated on: Sep 05, 2023 | 1:03 PM

Pankaja Gopinath Munde Shiva Shakti Parikrama Yatra : पंकजा मुंडे यांच्या 'शिव-शक्ती परिक्रमा' यात्रेला पाठिंबा देण्यास युतीतील बडा नेता पुढे; म्हणाले, ताई ताई 10-15 आमदार असतील, तर आम्हीही तुमच्या पाठीशी, युती करू...

ताई 10-15 आमदार असतील, तर युती करायला आम्ही तयार; पंकजा मुंडे यांना पाठिंबा देण्यास हा नेता पुढे
Follow us on

नाशिक | 05 सप्टेंबर 2023 : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या सध्या पद यात्रा करत आहेत. वेरूळच्या घृष्णेश्वराचरणी नतमस्तक होत पंकजा यांनी ‘शिव-शक्ती परिक्रमा’ यात्रेची सुरुवात केली. या यात्रेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाजप-शिवसेना आणि मित्रपक्षांच्या युतीतील नेत्याने पंकजा मुंडे यांच्याकडे युतीसाठी हात पुढे केला आहे. पंकजा मुंडे यांच्यासोबत युतीसाठी आपण सकारात्मक असल्याचं आमदार बच्चू कडू म्हणाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, अशी भूमिकाही बच्चू कडू यांनी मांडली आहे.

आम्ही पंकजा मुंडे यांच्यासोबत युती करण्यासाठी आम्ही तयार आहोत. पंकजाताई यांच्यात मोठी क्षमता आहे. यात मला काही शंका नाही. पंकजाताई यांच्यात किती क्षमता आहे, हे त्यांनी तपासून पहावं. स्वतःचे दहा पंधरा आमदार असतील, तर मग आम्हीही पंकजाताई यांच्यासोबत युती करू, असं बच्चू कडू म्हणालेत. लोकं तुम्ही जमा केली. पण लोकांची कामंही करावी लागतात. त्यांनी मनावर घेतले, तर त्या करूही शकतात, असं बच्चू कडू म्हणाले.

पंकजा मुंडे सध्या शिवशक्ती परिक्रमा यात्रा करत आहेत. पंकजा मुंडे यांची ही शिवशक्ती परिक्रमा यात्रा 11 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. 12 जिल्ह्यातून ही यात्रा जाईल. 5 हजार किलोमीटरची ही पदयात्रा असणार आहे. पंकजा मुंडे या यात्रेच्या माध्यमातून आज त्र्यंबकेश्वर ते भीमाशंकर असा प्रवास करत आहेत.  त्यांचं ठिकठिकाणी जंगी स्वागत केलं जात आहे. मोठमोठे हार आणि फुलांचा वर्षाव करत पंकजा मुंडे यांचं स्वागत केलं जात आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण देण्याची बच्चू कडू यांनी मागणी केली आहे. मराठा हे कुणबी आहेत. हे सूर्याइतकं सत्य आहे. त्यांना आरक्षण मिळायलात पाहिजे, असं बच्चू कडू म्हणालेत.

बच्चू कडू यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना टोला लगावला आहे. याअगोदर तीन विरोधी पक्षनेते सत्तेत गेले. आता विजय वडेट्टीवार भाऊ यांची तरी काय गॅरंटी आहे? या पाच वर्षात जे पक्षांतर झालं. ते मागच्या पन्नास वर्षात झालं नाही, असं बच्चू कडू म्हणाले.