नाशिक : राज्यात काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत उभी फुट पडली. त्यानंतर शिवसेनेत दोन गट निर्माण झाले. यामध्ये शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना असं बोललं जाऊ लागलं. यापूर्वी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतांना मधल्या काळात ते आजारी होते. त्यांच दरम्यान महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून रश्मी ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. उद्धव ठाकरे राजीनामा देऊन रश्मी ठाकरे मुख्यमंत्री होतील अशी राजकीय चर्चा होती. मात्र, या चर्चेला काही दिवसांतच पूर्णविराम मिळाला होता. परंतु रश्मी ठाकरे या सक्रिय राजकारणात येणार का? ही चर्चा काही थांबली नव्हती. परंतु आता रश्मी ठाकरे या सक्रिय राजकारणात येणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली असून नाशिकला महिला मेळावा घेणार असल्याचंही सांगितलं जाऊ लागलं आहे.
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात रश्मी ठाकरे यांचा महिला मेळावा घेण्यासाठी नाशिकचे पदाधिकारी प्रयत्नशील आहे. खरंतर उद्धव ठाकरे यांची मालेगाव येथे सभा असतांना काही महिला पदाधिकऱ्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.
त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाची महिला ब्रिगेड खिळखिळी झालेली असतांना ती आणखी मजबूत करण्यासाठी रश्मी ठाकरे यांनी मेळावा घ्यावा यासाठी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी गळ घातल्याची माहिती समोर येत आहे. मात्र दुसरीकडे राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहे.
रश्मी ठाकरे या सक्रिय राजकारणात येण्यासाठी काही निमित्त शोधत होत्या का? उद्धव ठाकरे यांचे आजारपण बघता त्यांच्या अनेक दौऱ्यात रश्मी ठाकरे त्यांच्या सोबत दिसून येत आहे. की राजकारणाचे धडे घेण्यासाठी रश्मी ठाकरे सोबत तर राहत नाही ना? असेही बोललं जाऊ लागलं आहे.
नाशिक हा खरंतर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. नंतर काळात सत्ता नसली तरी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीची मोठी फौज नाशिकमध्ये आहे. मुंबई नंतर नाशिकमध्ये शिवसेनेची मोठी ताकद आहे.
हीच संपूर्ण परिस्थिती बघून नाशिकमधून महिला मेळावा घेऊन रश्मी ठाकरे राजकारणाची साखर पेरणी करू पाहत तर नाही ना? असेही बोललं जाऊ लागलं आहे. तर दुसरीकडे सक्रिय राजकारणात येण्याकरिता महिला ब्रिगेडचं नेतृत्व हाती घेण्यासाठीची तर ही तयारी केली जात नाही ना? अशी वेगवेगळे तर्क लावले जात आहे.
मुंबईत निघालेल्या महाविकास आघाडीचा मोर्चा असो नाहीतर राज्यातील सभा असुदेत रश्मी ठाकरे गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांची पाठ सोडत नाहीये. त्यामुळे राजकीय संघर्ष करीत असलेल्या उद्धव ठाकरे यांना राजकीय पाठबळ देण्यासाठी रश्मी ठाकरे राजकीय मैदानात उतरत तर उतरत नाही ना? असंही बोललं जात आहे.
त्यामुळे रश्मी ठाकरे महिला मेळावा घेणार का? महिला मेळावा घेतला तर त्या कार्यक्रमाची आखणी नेमकी काय असेल? त्यात नेमकं काय बोलणार? तिथून त्या राजकीय काही घोषणा करणार का? असे विविध प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.