नाशिक : औरंगजेबच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापलं. MIM च्या कार्यक्रमात औरंगजेबच्या नावाच्या घोषणा दिल्याचा दावा केला जातोय. याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशातच संभाजीराजे यांनी या सगळ्यावर भाष्य केलंय. त्यांनी काही प्रश्न विचारले आहेत. तसंच वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना छत्रपती संभाजीराजे यांनी सल्ला दिला आहे.
कसं काय कुणी औरंगजेबचं नाव घेऊ शकतं? छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्या माणसाने त्रास दिला. छत्रपती संभाजीराजे यांची ज्याने हत्या केली. त्याचं कुणी कसं कौतुक करू शकतं?, असा संतप्त सवाल संभाजीराजे यांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबच्या कबरीची पाहणी केली. तिथे माथा टेकला. त्यावरून संभाजीराजे यांनी सल्ला दिलाय. हे दुर्दैव आहे. हे काही महाराष्ट्राचे संस्कार नाही. तुम्हाला जर अभिवादन करायचं असेल, तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समधीला जाऊन अभिवादन करा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जाऊन अभिवादन केलं होतं, असं संभाजीराजे म्हणाले.
भावी मुख्यमंत्री म्हणत संभाजीराजे यांच्या नावाचा बॅनर लावण्यात आला. त्यावर बोलताना, मी काही हे पोस्टर लावलेले नाहीत. माझ्या मनात काही नाही. फक्त प्रामाणिकपणे काम करत राहणं हे माझं ध्येय आहे. ते मी करतो आहे, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
पहिल्याच पावसात मुंबई तुंबली आहे. ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. त्यावर त्याला प्लॅनिंग पाहिजे. नियोजन पाहिजे. मुंबईसह महाराष्ट्रात नियोजन होणं गरजेचं आहे, असं संभाजीराजे म्हणालेत.
इगतपुरी मॉब लिचिंगच्या घटनेवरही संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला यासंदर्भात माहिती नाही. मी पोलीस अधिक्षकांसोबत बोलतो, असं ते म्हणाले.
राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी समितीच्या वतीने निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला संभाजीराजे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
कालपासून तब्येत खराब आहे. पण शाहू महाराजांचा कार्यक्रम असल्याने मी चुकवू शकत नाही. मी या घराण्यात जन्मलो. या घराण्याने मला शिकवलं की, आयुष्यभर सामाजिक काम करणे गरजेचे आहे. ते मी करण्याचा प्रयत्न करतोय, असं ते म्हणाले.