मुंबईः शिवसेनेत (Shivsena) आतापर्यंत अनेक शिवसैनिक दाखल झालेत. मात्र ज्या वेळी अस्तित्व पणाला लागलंय. शून्यातून उभारी घ्यावी लागतेय. अशा पडत्या काळात साथ देतील, तेच खरे पक्षनिष्ठ, असं वक्तव्य उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं होतं. अशाच स्थितीत आज आणखी एका महिला नेत्याचा शिवसेनेत प्रवेश झाला. धुळ्याच्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी आज मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांनी आज शिवबंधन बांधून घेतलं. नाशिकमधील निवडणुकीत एवढी राजकीय घडामोडी घडतानाही ४० हजार मतं मिळवली. ९ हजार मतं बाद झाली. सत्यजित तांबे विजयी झाले तरी मी हरलेली नाही. जनतेनंही हरू नये, असं धाडसी वक्तव्य शुभांगी पाटील यांनी केलं.
विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवण्यासाठी शुभांगी पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मी शिवसेनेत येणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं. त्यानुसार, त्यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि शिवबंधन बांधून घेतलं. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
शुभांगी पाटील म्हणाल्या, ‘ मी शब्दाला पक्की आहे. सामान्य घराच्या लेकीचा शब्द होता. पुढे टिकायचं आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यानंतर मला जी जबाबदारी देतील, ती पार पाडायला मी तयार आहे… अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
विधान परिषद निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही माझी खरी लढाई आता सुरु झाली आहे, अशी जणू डरकाळीच शुभांगी पाटील यांनी फोडली आहे. जुन्या पेंशन योजनेवरून सरकारविरोधात आंदोलन सुरू करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. शुभांगी पाटील यांच्या राजकीय वाटचालीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसमधून झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काही काळ काम केलं. त्यानंतर स्वतःची महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन ही संघटना स्थापन केली. नुकताच २१ सप्टेंबर २०२२ रोजी त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेतला.
नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळण्यासाठी त्या आग्रही होत्या. मात्र भाजपने तिकिट न दिल्याने त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. दरम्यान, सत्यजित तांबे यांनी काँग्रेसविरोधात पाऊल उचलल्याने भाजप तांबे यांना पाठिंबा देणार असल्याचं चित्र दिसलं. त्यानंतर शुभांगी पाटील यांनी मातोश्रीशी संपर्क साधला. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा त्यांना पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर महाविकास आघाडीनेही शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला.