चंदन पूजाधिकारी, नाशिकः सत्यजित तांबे (Satyajit Tambe) म्हणजे औरंगजेब आहेत. त्यांनी स्वतःच्या वडिलांनाच खुर्चीवरून खाली खेचलं, असा घणाघात प्रतिस्पर्धी उमेदवारानं केला आहे. नाशिक (Nashik) पदवीधर मतदार संघ निवडणुकीचा आखाडा दिवसेंदिवस अधिकच रंगत होत चालला आहे. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील (Shubhangi Patil) असा प्रमुख सामना रंगणार अशी चर्चा आहे. तर स्वराज्य संघटनेच्या उमेदवारानंही आपलाच विजय होणार असल्याचा ठामपणे दावा केलाय. सुरेश पवार यांनी टीव्ही 9 शी संवाद साधला, तेव्हा सत्यजित तांबेंवर हे घणाघाती आरोप केले.
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी येत्या ३० जानेवारी रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत काँग्रेसतर्फे डॉ. सुधीर तांबे यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही तर त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. सत्यजित तांबेंसाठी तीन टर्म निवडून आलेल्या सुधीर तांबे यांना माघार घ्यावी लागली, अशी चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे. औरंगजेबाने ज्या प्रमाणे स्वतःच्या वडिलांनाही सोडलं नव्हतं, त्याचप्रमाणे सत्यजित तांबे यांनी स्वतःसाठी वडिलांना खुर्चीवरून खाली खेचलं, असा आरोप सुरेश पवार यांनी केलाय.
छत्रपती संभाजीराजे अध्यक्ष असलेल्या स्वराज्य संघटनेचे नेते सुरेश पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. सत्यजित तांबेंचा पराभव करत आपणच विजयी होणार असल्याचा दावा सुरेश पवार यांनी केलाय. आपण भाजपच नव्हे तर सर्वच राजकीय पक्षांकडे पाठिंबा मागणार असल्याचं सुरेश पवार यांनी सांगितलं. तसेच आगामी काळात छत्रपती संभाजी महाराज राजकारणाची दिशा बदलणार असल्याचं भाष्यही त्यांनी केलंय.
एबी फॉर्म हातात असतानाही मुलाने वडिलांचा मान राखला नाही. वडिलांना दुखावून त्यांनी निवडणूक लढवायचा निर्णय घेतलाय. त्यांना फार पाठिंबा मिळवता आला नाही, त्यामुळे या निवडणुकीत फार चुरस वाटत नाही, असं वक्तव्य संजय पवार यांनी केलंय.
सत्यजित तांबेंसाठी वडिलांनी उमेदवारी सोडल्याचं चित्र नाशिकमध्ये दिसंतय. मात्र डॉ. सुधीर तांबे यांनी सत्यजित तांबेंच्या प्रचाराचा धडाका लावलाय. सत्यजित तांबे यांनी संपूर्ण मतदार संघात प्रचार केला असून त्यांना 40 ते 45 संघटनांचा पाठिंबा असल्याचा दावा सुधीर तांबे यांनी केलाय.
दरम्यान, शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केलाय. तांबे पिता-पुत्रांनी काँग्रेसला दगाफटका केल्यानंतर अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना काँग्रेसने समर्थन देण्याचं ठरवलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज नाशिकमध्ये पाटील यांच्या प्रचारार्थ येत आहेत. यावेळी तांबे पिता-पुत्रांवर ते घणाघाती टीका करण्याची शक्यता आहे.