मुंबई : येत्या क्रांती दिनी अर्थात 9 ऑगस्टला EVM विरोधात राजकीय पक्ष आणि विविध संघटनांचा मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. या मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा सहभागी होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. ईव्हीएमविरोधी मोर्चात प्रमुख विरोधी पक्ष सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर EVM ला जोरदार विरोध करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमविरोधी भूमिका आणखी तीव्र झाली आहे.
विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी अनेक राजकीय पक्षांनी केली आहे. वंचित नेते प्रकाश आंबेडकर, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएम विरोधी भूमिका अनेकवेळा जाहीर बोलून दाखवली आहे.
त्यामुळे आता ईव्हीएमविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चात राज ठाकरे, अजित पवार, प्रकाश आंबेडकर हे सर्व एकाच मंचावर येणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तसे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
राज ठाकरे यांनी EVM च्या मुद्याबाबत केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. त्यांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी निवडणूक आयुक्तांकडे केली होती. या भेटीनंतर राज ठाकरे थेट UPA च्या नेत्या आणि काँग्रेसच्या मार्गदर्शक सोनिया गांधी यांच्याही भेटीला गेले होते. EVM विरोधात देशव्यापी आंदोलन उभे राहण्याची गरज असल्याची भूमिका त्यावेळी राज ठाकरे यांनी मांडली होती.
राज ठाकरे हे EVM विरोधात राष्ट्रीय पातळीवर आंदोलन उभं करण्याची चाचपणी करत आहेत. त्यासाठी ते भाजप आणि EVM ला विरोध करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन करत आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती.
संबंधित बातम्या
EVM च्या मुद्द्यावर प्रकाश आंबेडकर आक्रमक, दिल्लीत आंदोलनाचा निर्णय
EVM विरोधातील फॉरमॅलिटी पूर्ण केली, बाकी पुढे काय करायचं आम्ही बघू : राज ठाकरे