नवी दिल्ली | 18 जुलै 2023 : शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मागच्या वर्षभरापासून रखडला आहे. बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. बच्चू कडू यांनी वारंवार आपल्याला मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा बोलून दाखवली आहे. पण अजित पवार भाजपसोबत जात सरकारमध्ये सामील झाले. तेव्हापासून बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आता बच्चू कडू यांनीच आपण मंत्रिपदावरचा दावा सोडत असल्याचंं म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत आहेत. मंत्रिपदासाठी ओढाताण सुरू आहे. त्यामुळे मी मंत्रिपदावरचा दावा सोडत आहे, असं मी आज जाहीर करतो. मला दिव्यांग विभागाचं काम दिलंय. त्यामुळं मी मंत्रिपदावरचा दावा सोडलाय. हवं तर आमचे आमदार राजकुमार पटेल यांना राज्यमंत्रिपद द्या, असं बच्चू कडू म्हणालेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून मग मंत्रिपदाबाबतची भूमिका स्पष्ट करेन, असं बच्चू कडू यांनी काही दिवसांआधी म्हटलं होतं. ती बैठक झाल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काल बैठक झाली. त्यांनी सांगितलं की आपली मैत्री कायम राहीली पाहीजे.मुख्यमंत्री सध्या अडचणीत आहेत. मला दिव्यांग खाते दिले म्हणून मी मंत्रिपदाचा दावा सोडतोय. मी मंत्रिपदाचा दावा करणार नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या कथित अश्लील व्हीडिओ प्रकरणावरही बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही गोष्टींचा अतिरेक केला की परिणाम भोगावा लागतो.तो व्हीडिओ मी पाहिलेला नाही. कुणाच्या वैयक्तिक जीवनात घुसू नये, असं मला वाटतं. पण जसं तुम्ही समोर जाता. लोकांसोबत बोलता तसंच पुन्हा तुमच्या सोबत होतं. सध्या राजकारणात द्वेषाने राजकारण केलं जातंय. पण तसं होता कामा नये, असं बच्चू कडू म्हणालेत.
अमरावतीच्या जागेवरून सध्या दुमत असल्यचंच दिसत आहे. त्यावर, हे भाजपला विचारलं पाहीजे, यावर मी बोलणार नाही, असं बच्चू कडू म्हणालेत.
बच्चू कडू यांच्या वक्तव्याला रवी राणा यांनी उत्तर दिलं आहे. बच्चू कडू काय बोलतात याबाबत मला माहिती नाही पण त्यांचा पक्ष आहे आणि हा त्यांचा अधिकार आहे, असं रवी राणा म्हणालेत.