नवी दिल्ली : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. व्यक्ती समोर नसल्यामुळे विनयभंग होत नाही, असा दावा छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी केला आहे. संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टिप्पणी केली होती. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर पोलिसात तक्रार दाखल झाली होती. तक्रारीच्या चौकशीनंतर संजय शिरसाट यांना पोलिसांकडून क्लीन चिट देण्यात आली आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय.
राज्यात सरकार त्यांचं आहे. ते काहीही करू शकतात. तिथं व्यक्ती नव्हती. मग इकडे तर खेळाडू महिला होत्या ना… मग तेव्हा काय केलं? हम करे सो कायदा सध्या सुरू आहे. सुषमा अंधारे एक सुशिक्षित नेत्या आहेत. त्यांना खालच्या पातळीवर बोलण्यात आलं हे गंभीर आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवाय संजय शिरसाट गौप्यस्फोट करणार, यावर जाऊ द्या हो… असं म्हणत राऊतांनी विषय टाळला.
भाजपचा झेंडा हा व्यापाऱ्यांचा शेठजींचा झेंडा आहे. आम्ही भाजपचा झेंडा फडकवू असं भाजपं म्हणतीये मग आता स्वत:ला शिवसेना म्हणवणारे गप्प का आहेत?, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.
आम्ही शिवसेनेचा भगवा फडकवू आमच्यात तेवढी क्षमता आहे आणि आम्ही झेंडा फडकवणारच… निवडणूका घ्यायला एवढी का फाटते? आधी निवडणूका तर घ्या… मग बघू, असा प्रश्नही संजय राऊत यांनी विचारला आहे.
मंत्री शंभराजे देसाई यांची राजकीय कारकीर्द ही शिवसेनेतून सुरू झाली. ते आमदार, मंत्री शिवसेनेतून झाले. त्यांनी आम्ही जसं करतो तसं अब्रुनुकसानीचा दावा करावा. विनायक राऊत हे शिवसेनेतील एक जबाबदार व्यक्ती आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
मोदी सरकारने याआधी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आणि आताची 4 वर्षे… एकूण नऊ वर्षे झाली. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं तयारी सुरू केली आहे. मात्र मागच्या 9 वर्षात काय केलं? नरेंद्र मोदींनी एक पत्रकार परिषद घ्यावी आणि सांगावं. पण नरेंद्र मोदी तसं करत नाहीत. ते पत्रकांशी बोलत नाहीत. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत नाहीत. तर ते केवळ मन की बात करतात, असं म्हणत राऊतांनी निशाणा साधला आहे.