नवी दिल्ली | 09 ऑगस्ट 2023 : शरद पवार… महाराष्ट्राच्या राजकारणात अढळ स्थान असणारा नेता. फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणात शरद पवार यांची छाप आहे. शरद पवार यांचे डावपेच भल्याभल्यांना संभ्रमात टाकतात. लोकसभा निवडणूक झाली. निकाल लागले अन् पंतप्रधानरपदाचा विषय आला की अनेकदा शरद पवार यांचं नाव अग्रस्थानी असतं. पण राजकीय मुत्सद्देगिरी सर्वश्रुत असतानाही पंतप्रधानपदाने अनेकदा त्यांना हुलकावणी दिली. यावर आता थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं आहे. शरद पवार यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमता आहे. मात्र काँग्रेसने त्यांना डावललं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
काल राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र NDA ची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. महाराष्ट्रातील राजकारणावर त्यांनी प्रकाश टाकला.
एनडीएच्या बैठकीत पंतप्रधानांकडून शिवसेना-भाजप युती तुटण्यावर भाष्य केलं. 2019 ला उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत असलेली युती तोडली. भाजपने ही युती तोडली नाही, असंही मोदींनी ठणकावून सांगितलं.
देशातल्या एनडीएमधून बाहेर पडलेल्या पक्षांचा पंतप्रधान मोदी यांनी दाखला दिला. एनडीएच्या खासदारांसमोर त्यांनी हे भाष्य केलं. यापुढेही एनडीए म्हणून कायम राहण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. काँग्रेसप्रमाणे भाजप अहंकारी नाही. त्यामुळे भाजप सत्तेवरून पायउतार होणार नाही, असा विश्वासही नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र सदनात NDA च्या खासदारांची बैठक पार पडली. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत ही बैठक झाली. बैठकीसाठी अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते.
सामना वृत्तपत्रावरही पंतप्रधान मोदी यांनी भाष्य केलंय. 2014 पासून शिवसेना एनडीएसोबत सत्तेत असतानाही ‘सामना’मधून वारंवार टीका केली जात होती. मात्र भाजपने त्यांना प्रतिउत्तर दिलं नाही, असं मोदी बैठकीत म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचनाही पंतप्रधान मोदी यांनी दिल्या आहेत.
NDA ची युती गेल्या 25 वर्षांपासून मजबूत आहे, हे नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत सांगितलं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे नेते एकेकाळी एनडीएसोबत होते. पण आता ते एनडीएपासून दूर गेले. त्यांना आम्ही दूर केले नाही.ते स्वत:हून एनडीए बाहेर गेले, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.