पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधकांना ‘तो’ सल्ला; म्हणाले, ही तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी!

| Updated on: Dec 04, 2023 | 11:42 AM

PM Narendra Modi Opposition Leader Parliament Winter Session : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधकांना 'तो' सल्ला; काय म्हणाले नरेंद्र मोदी? विरोधकांना कोणता सल्ला दिला? म्हणाले हे करा, त्यातच तुमचंही भलं आहे! ही विरोधकांना सुवर्णसंधी! वाचा सविस्तर...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधकांना तो सल्ला; म्हणाले, ही तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी!
Follow us on

नवी दिल्ली | 04 डिसेंबर 2023 : आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन होत आहे. या आधी पंतप्रधान मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांना सल्ला दिलाय. लोकसभेच्या अधिवेशनाआधी विरोधी पक्षातील माझ्या सहकाऱ्यांसोबत आमची चर्चा होते. आमची टीम त्यांच्याशी बोलते. सगळ्यांच्या सहकार्यसाठी आमचा आग्रह असतो. यावेळीही अशी सगळी प्रक्रिया झाली आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. संसद हे लोकशाहीचं हे मंदीर आहे. या लोकशाहीच्या मंदीराला अधिक मजबूत करण्यासाठी, देशाच्या विकासाच्या मार्गाला अधिक मजबूत बनवण्यासाठी संसद हा मोठा मंच आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. तर 3 राज्यातील विधानसभेचे निकाल उत्साह वाढवणारे आहेत, असंही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

माझं विरोधकांना आवाहन आहे की, त्यांनी जास्तीत जास्त तयारी करून संसद अधिवेशनाला यावं. संसदेत जी विधेयकं मांडली जातील. त्यावर दीर्घ चर्चा व्हावी. उत्तमोत्तम मुद्दे मांडले जावेत. जेव्हा कुणी चांगला सल्ला देतं तेव्हा त्यात ग्राऊंडवरचे मुद्दे असतात. पण या मुद्द्यांवर चर्चाच झाली नाही. तर मात्र देश या चांगल्या चर्चेला मुकतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

विरोधकांना सल्ला

संसदेचं अधिवेशन ही विरोधकांसाठी सुवर्णसंधी आहे. पण काल लागलेल्या विधानसभेच्या निकालाचा राग या अधिवेशनात काढण्यापेक्षा त्यांनी या पराभवातून शिकण्याची गरज आहे. मागच्या नऊ वर्षांपासून सुरु असेलली नकारात्मकता सोडून सकारात्मतेने विरोधक या अधिवेशनात सहभागी झाले. तर देशाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल. त्यांच्यासाठी चांगलं दार उघडलं जाईल. ते विरोधात आहेत. तरी त्यांना हा सल्ला आहे, असं मोदी म्हणाले.

आजपासून संसदेचं अधिवेशन

आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन होत आहे. अधिवेशन काळात 15 बैठका होणार आहेत. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत या बैठका होणार आहेत. यात महत्त्वाच्या विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता आहेत. तीन राज्यात भाजपने यश मिळवल्याने विरोधकांना घेरण्याच्या तयारीत भाजप आहे. आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात विरोधक आक्रमक होण्याची दाट शक्यता आहे.

लोकसभा तहकूब

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत उपस्थित होते. मात्र लोकसभेचं कामकाज सुरू होताच विरोधकांचा जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. त्यामुळे 12 वाजेपर्यंत लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं आहे. संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांचा सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला.