नवी दिल्ली 08 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. जयंत पाटील लवकरच अजित पवार गटात सामील होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यावर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील आणि आमचा DNA सारखा आहे. ते कधीही भाजपसोबज जाणार नाहीत, असं संजय राऊत म्हणालेत. ते राजधानी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.
आपला नेता, पक्ष अडचणीत असताना पळून जाणारे जयंत पाटील नाहीत. आमचा आणि त्यांचा DNA एक आहे. आम्ही लढणारे आहोत, असं संजय राऊत म्हणालेत.
या देशात संसद, विधिमंडळ हे उध्वस्त करण्याचं काम सुरू आहे, असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केली आहे.
दिल्लीला पूर्ण राज्य देण्याची घोषणा निवडणुकीत भाजपने दिली होती. पण ते भाजप आहे ते अधिकार काढून घेत आहेत. आता सगळा कारभार नोकर शहाच्या हाती देत आहेत. तुम्हाला लोकशाही मान्य नाही हे दिसतंय. राज्यपालांच्या हाती तुम्ही कारभार देणार आहे. राज्यपाल महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणात दिसतात. बाकी कुठं दिसत नाहीत. आम्ही या विधेयकाला विरोध करणार आहोत, असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.
असंच कौतुक 2024 पर्यंत ठेवा. 2024 च्या निवडणुकीनंतरही अजितदादांचं कौतुक कायम ठेवा, असं संजय राऊत म्हणाले. ज्यांच्यावर आरोप केले. भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांनाच सोबत घेतलं. मांडीला मांडी लावत सरकारमध्ये बसवलं, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर घणाघात केलाय.
काल राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांचं फोनवरून बोलणं झालं. त्यांना आजच खासदारकी पुन्हा परत दिली पाहिजे, ही आमची मागणी आहे. आज आम्ही सर्वजण बसून चर्चा करू आणि राहुल गांधी यांना आजच सदस्यत्व द्यावं ही मागणी करू, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
मणिपूरमधील हिंसाचारावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. तिथं सरकार आहे की नाही? असा प्रश्न सगळे विचारत आहेत. तिथे परिस्थिती गंभीर आहे, असं संजय राऊत म्हणालेत.