रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई : एकनाथ शिंदे गटाचं ढाल-तलवार (Dhal Talvar) हे पक्ष चिन्ह असलेल्या पहिल्या कार्यालयाचं नवी मुंबईत उद्घाटन झालं. रविवारी नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये (Airoli, Navi Mumbai) या ऑफिसचं उद्घाटन करण्यात आलं. ऐरोलीतल्या कार्यालयावर ढाल-तलवारीची भव्य प्रतिकृती लावण्यात आलीय. कार्यालयाच्या उद्घाटनावेळी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले (Vijay Chougule) उपस्थित होते. मोठ्या उत्साहात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी या उद्घाटनावेळी जल्लोष केला.
ऐरोली विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाने नवं ऑफिस सुरु केलं आहे. या ऑफिसमध्ये ढाल तलवार निशाणीची भव्य प्रतिकृती साकारण्यात आलीय. नवी मुंबईचे शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांच्या हस्ते या निशाणीचं अनावरण करण्यात आलं. यावेळी ढोल ताशाच्या गजरात पक्षाला मिळालेल्या नव्या चिन्हाचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून ठाकरे गट आणि शिंदे गट यांना तात्पुरत्या स्वरुपात पक्ष चिन्ह आणि पक्षाचं नाव देण्यात आलं आहे. शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना, असं नवं नाव निवडणूक आयोगानं दिलं. तर ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे हे नवं नाव दिलं. शिवसेनेला मशाल हे चिन्हा एकीकडे देण्यात आलं असून शिंदे गटाला ढाल तलावर हे चिन्ह निवडणूक आयोगानं दिलंय.
शिंदे गटाकडून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार ठाकरे गटाच्या विरोधात उभा केला जाईल, असं सांगितलं जात होतं. मात्र अखेर शिंदे गटाने आपला उमेदवार न देता त्यांनी भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांना पाठिंबा दिला आहे. तर ठाकरे गटाकडून ऋतुजा पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, या पार्श्वभूमीरही राजकीय घडामोडींना वेग आला आहे.