रवी खरात, नवी मुंबईः राजकारणात परस्परांविरोधाक कट्टर भूमिका असलेले नेते एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होतात. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. मात्र सध्या राजकीय आरोप प्रत्यारोप, हेव्या-दाव्यांनी एवढी टोकाची पातळी गाठली आहे की, असं काही दिसलं की राजकीय चर्चांना जोर चढतोय. नवी मुंबईत (Navi Mumbai) अशीच एक घटना घडली आहे. शिंदे गटाचे नेते भरत गोगावले (Bharat Gogawle) नुकतेच ठाकरे गटाच्या नेत्याच्या लग्नात सहभागी झाले. नुसते सहभागीच झाले नाही तर स्टेजवर डान्सदेखील केला. पनवेल तालुक्यातील शिवसेनेचे बंडखोर आणि ठाकरे गटाचे नेते यांच्यातला वाद टिपेले पोहोचला असताना या घटनेने वेगळ्याच शंका घेतल्या जात आहेत. ठाकरे गटाच्या नेत्यांना आकर्षित करण्यासाठी ही ट्रिक अवलंबली की काय अशी चर्चा सुरु आहे.
पनवेल तालुक्याचे ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष रघुनाथ पाटील यांच्या मुलीच्या लग्नाचा हा कार्यक्रम होता. शिंदे गटाचे आमदार आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते भरत गोगावले या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. लग्नातील हळदीच्या कार्यक्रमात भरत गोगावले आले. त्यांनी पाटील यांच्या मुलीला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच तेथे हळदीच्या कार्यक्रमात सुरू असलेल्या डान्सवर ठेकाही धरला. भरत गोगावले यांचा हाच व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय. शिंदे गटाचे नेते ठाकरे गटाच्या नेत्याच्या कार्यक्रमात दिसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नवी मुंबई, पनवेलमध्ये ठाकरे गटाची शिवसेना आणि शिंदे गट या दोन्ही गटातील संघर्ष टोकाला गेला आहे. अशा स्थितीत भरत गोगावले हे ठाकरे गटाच्या तालुका अध्यक्षांच्या लग्न सोहळ्यात अगदी बेधुंद होऊन नाचताना दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
भरत गोगावले हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. महाड विधानसभा संघाचे आमदार आहेत. शिंदे गटाने केलेल्या बंडात त्यांचा मुख्य सहभाग होता. त्यात रायगडचे ते शिंदे गटाचे मुख्य नेते आहेत. जिल्यातील तिन्ही आमदार शिंदे गटात गेले. मात्र पदाधिकारी ठाकरे गटातच राहिले. त्यात ठाकरे गटाच्या तालुका अध्यक्षांकडील कार्यक्रमात जाऊन नाचणं म्हणजे त्यांना आपल्याकडे आकर्षित केले जात आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.